अहमदनगर

जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; 25 हजार 418 शेतकर्‍यांच्या बँक खात्यात…

अहमदनगर- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 प्रोत्साहनपर लाभ योजने अंतर्गत गुरूवारी 90 कोटी 93 लाख रुपयांची रक्कम जमा झाली.

 

पीक कर्ज घेतलेल्या पण नियमित परतफेड केलेल्या नगर जिल्हा सहकारी बँकेच्या 25 हजार 418 शेतकर्‍यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा झाल्याने या शेतकर्‍यांची दिवाळी गोड होणार आहे.

 

दरम्यान, या प्रोत्साहनपर लाभ योजनेतील 644 शेतकरी सभासदांनी त्यांची आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करून घेण्याचे आवाहन जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. माधवराव कानवडे व मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी केले आहे.

 

 

राज्य शासनाने राज्यातील शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी सन 2017-18, 2018-19 व सन 2019-20 या कालावधीत नियमित पीक कर्ज परतफेड केलेल्या शेतकरी सभासदांना 50 हजार रूपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची विशेष योजना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 योजनेत जाहीर केली आहे.

 

या योजनेच्याअनुषंगाने जिल्ह्यातील जिल्हा सहकारी बँकेच्या पात्र शेतकरी सभासदांच्या 1 लाख 77 हजार 269 कर्ज खात्यांची माहिती शासकीय लेखापरिक्षकांकडून तपासणी करून शासन पोर्टलवर अपलोड केली आहे.

 

या माहितीची शासनस्तरावर संगणकीय तपासणी होऊन जिल्हा सहकारी बँकेच्या पात्र शेतकरी सभासदांपैकी 32 हजार 601 शेतकरी सभासदांची पहिली यादी शासन पोर्टलवर आधार प्रमाणिकरण करण्यासाठी दि. 12 ऑक्टोबर रोजी प्रसिध्द झाली होती. यापैकी जिल्हयातील 31 हजार 920 शेतकरी सभासदांनी आधारप्रमाणिकरण प्रक्रिया पूर्ण केली आहे.

 

यापैकी पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील जिल्हा सहकारी बँकेच्या 25 हजार 418 कर्जदार शेतकरी सभासदांच्या जिल्हा बँकेत असलेल्या खात्यात 90 कोटी 93 लाख प्रोत्साहनपर लाभाची रक्कम जमा झाली असल्याची माहिती बँकेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. कानवडे यांनी दिली.

 

दरम्यान पीक कर्जाचे हप्ते प्रामाणिकपणे व वेळच्यावेळी परतफेड करणारे जिल्ह्यात 2 लाख 3 हजार 769 शेतकरी असून, त्यांना 50 हजारापर्यंत प्रोत्साहन कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा लाभ मिळणार्‍या 37 हजार 164 शेतकर्‍यांची पहिली यादी पोर्टलवर प्रसिद्ध करून, या शेतकर्‍यांच्या आधार कार्ड प्रमाणीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे.

 

यातील जिल्हा बँकेच्या 25 हजारावर शेतकर्‍यांचे आधार प्रमाणीकरण होऊन त्यांच्या खात्यात सुमारे 91 कोटीची रक्कम जमा झाली आहे. अन्य बँकांतील किती शेतकर्‍यांचा असा लाभ मिळाला, याची आकडेवारी प्रतीक्षेत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button