अहमदनगर : बॉयफ्रेंडसोबत दिवसभर फिरल्याची भीती ! तीन मुली थेट हैदराबादला पोहोचल्या आणि नंतर…
तिथे आसरा मिळाला नाही, म्हणून त्यांनी तेथील पोलिस स्टेशन गाठले. आई-वडिलांच्या भीतीपोटी हैदराबादला आल्याची कबुली दिली.

दिवसभर बॉयफ्रेंडसोबत घालविल्यानंतर आई-वडिलांच्या भीतीपोटी तिघी मैत्रिणींनी रात्रीच रेल्वेस्टेशन गाठले. रेल्वेने पुण्याला आणि तेथून हैदराबादला पोहोचल्या.
तिथे आसरा मिळाला नाही, म्हणून त्यांनी तेथील पोलिस स्टेशन गाठले. आई-वडिलांच्या भीतीपोटी हैदराबादला आल्याची कबुली दिली.
मैत्रिणींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना शुक्रवारी शासकीय वाहनातून अहमदनगरला आणण्यात आले. या मुली मंगळवारी (दि. १२) रात्री नगरमधून बेपत्ता झाल्या होत्या. याबाबत नातेवाइकांच्या फिर्यादीवरून मुलींना पळवून नेल्याचा गुन्हा नोंद झाला होता.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी या तिघी मैत्रिणी शाळेत जातो, म्हणून घरातून बाहेर पडल्या; परंतु शाळेत न जाता त्या मित्रांसोबत फिरायला गेल्या. दिवसभर मित्रांसोबत घालविल्यानंतर त्या नगर शहरात आल्या;
पण आई-वडिलांच्या भीतीपोटी घरी गेल्या नाही. त्यांनी आम्ही घरी जाऊ शकत नाही, तुम्ही राहण्याची सोय करा, अशी विनंती मुलींनी फोन करून मुलांकडे केल्याचे पोलिसांनी सांगितले, मात्र मुलांनी त्यांची राहण्याची सोय केली नाही.
त्यामुळे मुलींनी थेट रेल्वेस्टेशन गाठले. रेल्वेने या मुली पुण्याला गेल्या. तेथून त्या हैदराबादला गेल्या. यातील एका मुलीच्या नातेवाईकाचे हैदराबादमध्ये हॉटेल आहे. या हॉटेलवर गेल्यानंतर त्यांनी मुलींना पोलिस ठाण्यात जाण्यास सांगितले.
त्यांनी समजावल्यामुळे या मुली तेथील पोलिस ठाण्यात गेल्या. तेथील पोलिसांनी विचारपूस केली, तेव्हा या मुली नगरच्या असल्याचे समजले. त्यांनी तोफखाना पोलिसांशी संपर्क केला. अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिस उपनिरीक्षक सचिन रणशिवरे यांच्यासह एक पथक शासकीय वाहनातून हैदराबादला रवाना झाले. गुरुवारी त्यांनी मुलींना ताब्यात घेतले.
ते मित्र पोलिसांच्या ताब्यात
या मुली ज्या मित्रांसोबत फिरायला गेल्या होत्या, त्यांना तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली. त्यांनी मुलींना नगरमध्ये आणून सोडले होते.
यातील एक मुलगी घरी गेली; पण उर्वरित तिघी मैत्रिणी घरी गेल्या नाहीत. त्या घरी जाण्यास घाबरत होत्या. त्यांच्याशी चर्चाही झाली; पण नंतर त्या कुठे गेल्या माहीत नाही, अशी कबुली मुलांनी दिली. तेथून पोलिसांच्या तपासाला दिशा मिळाली.
पळवून नेल्याची अफवा; पोलिसांची धावपळ
नगरमधून काही मुलांनी मुलींना पळवून नेल्याची अफवा पसरली. पोलिसांनी त्यादिशेने तपास केला; पण धागेदोरे मिळाले नाहीत. मुलांना ताब्यात घेतल्यानंतर वस्तुस्थिती समोर आली.