अहमदनगर

Ahmednagar News | चहा न दिल्याने चहावाल्यास फायटरने मारहाण

चहा न दिल्याने चहावाल्यास शिवीगाळ करत फायटरने मारहाण केल्याची घटना कायनेटिक चौकात घडली. तुषार सतीश कोकडवार (वय 32, रा. केडगाव, अहमदनगर) असे मारहाण झालेल्या तरूणाचे नाव असून संकेत जाधव याच्या विरोधात कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान फिर्यादी कोकडवार हे चहाच्या टपरीवर असताना संकेत जाधव त्याठिकाणी आला. फिर्यादी इतर गिर्‍हाईकांना चहा देत असताना जाधवने मोठ्याने ओरडून चहा मागितला.

त्यावेळी ईतर गिर्‍हाईकांना चहा दिल्यानंतर चहा देतो, असे कोकडवार यांनी जाधवला सांगितले असता जाधवने गॅसच्या टाकीला लाथ मारली. कोकडवार यांनी लाथ का मारली,

असे विचारल्याचा राग आल्याने जाधवने शिवीगाळ करत फायटरने डाव्या डोळ्यावर तसेच उजव्या कानावर जबर मारहाण केली. तसेच येथे धंदा कसा करतो हे पाहतोच,

असा दम दिला. मारहाणीत कोकडवार जखमी झाले असून त्यांच्यावर शहरातील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी दिलेल्या जबाबावरून कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार रवींद्र औटी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button