अहमदनगर

आधी वाद घालायचा अन् नंतर दागिने चोरायचे; टोळी जेरबंद

अहमदनगर- महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या टोळीला अटक करण्यात श्रीरामपूर शहर पोलिसांना यश आले आहे. काल श्रीरामपूर शहर पोलिसांनी चार जबरी गुन्ह्यातील तीन सोनसाखळी चोरांना ताब्यात घेतले असून पोलिसांनी त्यांच्याकडून साडेसहा तोळे सोन्याचे दागिने तसेच तीन चोरीच्या दुचाकी असा एकूण 5 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

 

बेलापूर रोडवरील अनमोल रसवंती याठिकाणाहून रामदास भाऊसाहेब खंडागळे, रा. एकलहरे, ता. श्रीरामपूर हे त्यांची हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकलवर पत्नीसह घरी जात असताना, त्यांचे पाठीमागून मोटरसायकलवरून येणारे तीन अनोळखी इसमांनी पत्ता विचारण्याचा बहाणा करून, फिर्यादीस तु आम्हाला शिवीगाळ केली असे म्हणून गाडी अडवून, फिर्यादी व फिर्यादीची पत्नी यांना मारहाण केली व फिर्यादीची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल व फिर्यादीच्या पत्नीचे गळ्यातील 3 ग्रॅम वजनाचे मनी मंगळसूत्र चोरून नेले.

 

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर लागलीच पोलीस पथक आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना झाले असता, यातील एक इसम मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता अक्षय सुरेश कुलथे रा. राहुरी असे सांगितले त्यास दाखल गुन्ह्यात अटक करून तपास केला असता, त्याने सदरचा गुन्हा हा त्याचे साथीदार विशाल ऊर्फ गणेश बाळासाहेब शेटे व दीपक रामनाथ पवार रा. राहुरी यांच्यासोबत केल्याचे कबुल केले.

 

पोलीस पथकाने तपासाची चक्रे फिरवीत लागलीच पसार आरोपींचा शोध घेतला असता ते श्रीरामपूरमध्ये चोरीच्या मोटारसायकलवर येणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याने सापळा लावून, पाठलाग करत त्यांना शिताफीने पकडले असता, त्यांच्या ताब्यात गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटारसायकल मिळून आली. नंतर आरोपींना पोलीस कस्टडी रिमांडमध्ये दाखल गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी तीन जबरी चोरी स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली दिली.

 

आरोपी अक्षय सुरेश कुलथे (रा. राहुरी) हा राहुरी पोस्टे गु.र.नं.286/2020 वि. कलम 302 या गुन्ह्यातून जामिनावर मुक्त झाल्यानंतर वरीलप्रमाणे गुन्हे केलेले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button