अहमदनगर ब्रेकींग: पाच वर्षीय बालिकेच्या डोक्यात दगड मारून…

Ahmednagar News : डोक्यात दगड मारून एका पाच वर्षीय मुलीला जखमी केल्याची घटना भिंगार शहरातील वडारवाडी चौकात घडली. तिच्यावर अहमदनगर शहरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी जखमी मुलीचा जबाब नोंदविला असून तीचे वडिल रामा सतवीर ठाकूर (वय 28 रा. खळेवाडी, भिंगार) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणारा संतोष धोत्रे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. वडारवाडी, भिंगार) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी रात्री रामा ठाकूर त्यांच्या दुचाकीवर पत्नी, मुलगा व मुलगी यांना घेवून भिंगारमधील विजय लाईन येथे राहणार्या त्यांच्या आत्याकडे जात होते. त्यावेळी संतोष धोत्रे याने फिर्यादीच्या दुचाकीला त्याची दुचाकी आडवी लावून शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.
‘तु वडारवाडी चौकात ये, तुझ्याकडे पाहतो’, असे म्हणून निघुन गेला. फिर्यादी, त्यांची पत्नी व मुले काही वेळाने वडारवाडी चौकात आले असता धोत्रे हा तेथे दगड घेवुन उभा होता.
त्याने फिर्यादी व त्यांच्या पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी फिर्यादी, त्यांची पत्नी व मुलांनी पळ काढला. धोत्रे याने दगड फेकून मारला असता
तो फिर्यादीची पाच वर्षाची मुलगी सनिया हिला लागला असून ती जखमी झाली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस नाईक आर. टी. गोरे करीत आहेत.