ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान दारूचा पूर; 42 जणांना अटक

अहमदनगर- जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाने 15 ते 17 डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यात 1 हजार 185 लिटर अवैध दारू पकडली. याप्रकरणी 42 लोकांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केलेली आहे. पकडलेल्या अवैध दारूत देशी दारू, विदेशी दारू, रसायन, हातभट्टी आणि ताडीचा समावेश आहे.
यासह उत्पादन शुल्क विभागाने सात वाहने जप्त केली असून यात एका चारचाकी वाहनाचा समावेश आहे. जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका या भयमुक्त वातावरणात होण्यासाठी मतदारांना दारूच्या आमिषापासून रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी सर्व क्षेत्री अधिकार्यांना अवैध दारू विरोधात धडक मोहीम राबवण्याची सूचना केली होती. त्यानुसार उत्पादन शुक्ल विभागाच्या विभागीय अधिकार्यांनी 15 ते 17 तारखेदरम्यान, जिल्ह्यातून होणारी अवैध दारू वाहतूक, मद्य विक्री, हातभट्टी दारू, अवैध ताडी विक्री, निर्मिती, अवैध दारू विक्री करणारे हॉटेल्स, धाबे यांच्यावर कारवाई केली.
या कारवाईत 42 आरोपींवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे. तसेच 250 लिटर देशी दारू, 101 लिटर विदेशी दारू, 400 रसायन, 229 लिटर हातभट्टी, 205 लिटर ताडी पकडण्यात आली आहे. या कारवाई सात वाहने जप्त करण्यात आली असून यात एका चार चाकी वाहनाचा समावेश आहे. एकूण पकडेला मुद्देमाल हा 11 लाख 68 हजार 274 रुपयांचा आहे.