फ्लॅट घेण्यासाठी 15 लाख आणले नाही म्हणून विवाहितेला काढले घराबाहेर

अहमदनगर- फ्लॅट घेण्यासाठी माहेरून 15 लाख रुपये आणले नाही म्हणून विवाहितेचा छळ केला आणि तिला घराबाहेर काढून दिले. पीडित विवाहितेने यासंदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिच्या पतीसह सात जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
पती राजेश नानासाहेब गवळी, सासरे नानासाहेब गवळी, सासू शकुंतला गवळी, दीर सुनील गवळी, जाऊ विद्या गवळी (सर्व रा. चिंबळे ता. श्रीगोंदा), नणंद प्रमिला कैलास ताकवणे, नंदाई कैलास ताकवणे (दोघे रा. शालुमालु पारगाव ता. दौंड, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
12 डिसेंबर, 2014 रोजी फिर्यादी यांचा विवाह राजेश गवळीसोबत झाला होता. फिर्यादी यांना लग्न झाल्यानंतर सुरूवातीच्या काही दिवस सासरच्या लोकांनी चांगले नांदविले. त्यानंतर 12 जानेवारी, 2016 पासून पतीसह सात जणांनी चांगले लग्न लावून दिले नाही, हुंडा दिला नाही. तसेच हॉटेल चालू करण्यासाठी व शालुमालु पारगाव येथे फ्लॅट घेण्यासाठी वडिलांकडून 15 लाख रुपये घेऊन ये असे म्हणून फिर्यादीला शिवीगाळ करून उपाशीपोटी ठेवले. शारिरीक व मानसिक त्रास देऊन घराबाहेर हाकलून दिले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.