माजी नगरसेवकाचा प्रताप; अॅनिमल वेस्ट टाकण्यास विरोध केल्याने मनपा पथकाला मारहाण

अहमदनगर- अॅनिमल वेस्ट टाकण्यास विरोध करणार्या महानगरपालिकेच्या स्वच्छता निरीक्षक व दोन कर्मचार्यांना नगरसेवक शेख मुद्दसर इसाक अहमद (रा. मुकुंदनगर) यांच्यासह पाच जणांनी शिवीगाळ, धक्काबुक्की करत मारहाण केली.
रात्री ही घटना घडली आहे. स्वच्छता निरीक्षक राजेश प्रकाश तावरे (वय 37 रा. तेलीखुंट) यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या आदेशाने घनकचरा व्यवस्थापक यांनी 11 नोव्हेंबर, 2022 पासून अॅनिमल वेस्ट देखरेख व प्रतिबंध करण्याकामी पथक नियुक्त केले असून पथकाची ड्यूटी सकाळी सहा ते आठ व सायंकाळी पाच ते 10 अशी कोठला स्टॅण्ड ते डीएसपी चौक परिसरात लावण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री स्वच्छता निरीक्षक राजेश तावरे व त्यांच्या पथकातील कर्मचारी गणेश पांडुरंग घोरपडे (वय 23 रा. सिध्दार्थनगर, लालटाकी) व विशाल अशोक खंडागळे (वय 30 रा. नालेगाव) ड्यूटीवर होते.
रात्री नऊ वाजता पॅगो रिक्षामधून काही व्यक्ती कोठला परिसरात अॅनिमल वेस्ट टाकण्यासाठी आले होते. त्यावेळी पथकाने त्यांना सदर ठिकाणी अॅनिमल वेस्ट टाकण्यास विरोध केला. तुम्ही येथे अॅनिमल वेस्ट टाकू नका, टाकल्यास दंड केला जाईल, असे सांगितले. त्या व्यक्तींनी माजी नगरसेवक शेख मुद्दसर इसाक अहमद यांना फोन लावून बोलून घेतले. ते दोन साथीदारांसह तेथे आले. त्या पाच जणांनी फिर्यादीसह दोन कर्मचार्यांना शिवीगाळ, धक्काबुक्की केली. धक्काबुक्कीत कर्मचार्यांना जखमी झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान महानगरपालिकेच्या पथकातील स्वच्छता निरीक्षक व कर्मचार्यांना मारहाण झाल्याची घटना संबंधीत विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांना सांगून देखील ते भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आले नाहीत. त्यामुळे मनपा कामगारांत तीव्र असंतोष निर्माण झाला असून मनपातील वरिष्ठ अधिकार्यांच्या कामगारांकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करण्याच्या अन्यायकारक धोरणाविरोधात सोमवार, 28 नोव्हेंंबर रोजी मनपात निषेध सभा आयोजित केली आहे, अशी माहिती कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी दिली आहे.