पोलीस ठाण्यात येत चौघांची अधिकार्यांना शिवीगाळ

कोतवाली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांचा एकेरी भाषेत उल्लेख करत सहाय्यक पोलीस निरीक्षकांना अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल किसन बत्तीन (वय 29 रा. तोफखाना), सागर हरिभाऊ सोबले (वय 21 रा. कायनेटीक चौक), प्रशांत बाळासाहेब ढलपे (वय 38 रा. चितळरोड) आणि अमित राजकुमार सावंत (वय 36 रा. भराडगल्ली) यांचा आरोपीमध्ये समावेश आहे.
पोलीस अंमलदार देवराम ढगे यांनी फिर्याद दिली आहे. चौघे कोतवाली पोलीस ठाण्याच्या ठाणे अंमलदार कक्षात आले. राहुल गवळी याच्याकडून मटक्याचे 80 हजार रूपये घेणे असून तो पैसे देत नाही, असे म्हणत चौघांनी आरडाओरड सुरू केली.
त्यांनी मद्यप्राशन केले होते. त्यांना सहाय्यक निरीक्षक रवींद्र पिंगळे आणि इतर कर्मचारी शांत करत होते. मात्र, ते काहीच ऐकून घेत नव्हते. त्यानंतर पिंगळे बाहेर गेले असता
राहुल बत्तीन याने त्यांना शिवीगाळ केली. तसेच प्रशांत ढलपे याने निरीक्षक संपत शिंदे यांचा एकेरी भाषेत उल्लेख केला, अपशब्द वापरून दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.