ट्रॅक्टर खरेदीत चार लाखांना गंडा; पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या

ट्रॅक्टर खरेदीच्या व्यवहारात चार लाख रूपयांची फसवणूक करणारा आरोपी रामचंद्र ज्ञानदेव भागीरे (रा. सोलनकरवाडी, ता. माढा, जि. सोलापूर) याला कोतवाली पोलिसांनी राहत्या घरी जाऊन ताब्यात घेत अटक केेली. त्याच्याकडून ट्रॅक्टर हस्तगत करण्यात आला आहे.
या प्रकरणी प्रसाद चिंतामण हिंगे (रा. खोडद गडाचीवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली होती. हिंगे यांनी नगर येथील नाथ मोटर्समार्फत जुन्या वाहन खरेदी-विक्रीकरीता ट्रॅक्टर विक्रीस लावलेला होता.
त्याचा व्यवहार ठरल्याने 13 जानेवारी रोजी मार्केटयार्ड येथे रामचंद्र भागीरे यांना 5 लाख 80 हजार रूपये किंमतीला सौदा केला. भागीरे यांनी एक लाख 80 हजार रूपये देऊन ट्रॅक्टर ताब्यात घेतला.
उर्वरीत रक्कम चार लाख रूपये दोन दिवसात देण्याचे ठरले. मात्र, उर्वरीत पैसे न देता ट्रॅक्टर घेऊन गेले व फसवणूक केल्याची फिर्याद हिंगे यांनी केली होती. त्यानुसार कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
कोतवाली पोलिसांनी आरोपीच्या घरी जाऊन शोध घेत सदर ट्रॅक्टर ताब्यात घेऊन आरोपी भागीरे यांना अटक केली. पुढील तपास सहाय्यक फौजदार डि. बी. ढगे हे करत आहेत.