अहमदनगर

लग्नाचा बनाव करून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

अहमदनगर- लग्नाचा बनाव करून फसवणूक करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. लग्न होत नसलेल्या वरांना शोधून त्यांचे लग्न लावून देण्याचे व आर्थिक फसवणूक करायची अशा टोळीचा पर्दाफाश करण्यात संगमनेर तालुका पोलिसांना यश आले आहे.

 

याप्रकरणी नवर्‍या मुलीसह तिची बनावट आजी, भाऊ व एक कथित नातेवाईकासह चौघांना अटक करण्यात आली आहे. तालुक्यातील एका गावात शेतकरी कुटुंबातील एका मुलाच्या लग्नासाठी वधूचा शोध घेतला जात होता. अशातच एका नातेवाईकाने स्थळ सुचविले. या कुटुंबाने संबंधीत मध्यस्थाला सोबत घेत बुलढाणा जिल्ह्यातील लोणार गाठले.

 

बोलणी करतांना तालुक्यात नवरी आणून 9 ऑगस्ट रोजी विवाह करण्याचे ठरले. लग्नाच्या दिवशी वधूच्या भावाकडे रोख 1 लाख 10 हजार रुपये व नवरीसाठी दीड तोळा सोन्याचे दागिणे देण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे लग्न झाल्यानंतर नवरीच्या माहेरची मंडळी परत गेली.

 

11 ऑगस्ट च्या रात्री पोटात दुखत असल्याचे सांगत नववधूने नवर्‍याला औषध आणण्यासाठी गावातील दुकानात पाठविले. आणि तिने संधी साधत पळ काढला. या कुटुंबाने सदर नववधूचा दोन महिने शोध घेतला. अखेर गावात चर्चा सुरु झाल्याने या प्रकरणातील सत्य उघड झाले. आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्याने वराकडील मंडळींनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

 

त्यानुसार पोलिसांनी नवरी मुलगी यशश्री नरहरी केंद्रे (रा. शिवाजीनगर, ता. परळी, जि. बीड), तिचा कथित भाऊ हनुमंत सीताराम गर्जे (रा. आंबलवाडी, ता. अंबाजोगाई, जि. बीड), बनावट आजी यशोदाबाई आश्रू कराळे (रा. रायेगाव, ता. लोणार, जि. बुलढाणा) व संतोष किसन खोडके (रा. जोगेश्वरी, ता. रिसोड, जि. वाशीम) या चौघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. अटक केलेल्या चौघांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button