अहमदनगर

लोन अ‍ॅपद्वारे व्यावसायिकाची फसवणूक; साडेचौदा लाखांना गंडा

अहमदनगर- सावेडी उपनगरातील एका व्यावसायिकाची लोन अ‍ॅपद्वारे सुमारे 14 लाख 43 हजार 36 रूपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी संबंधीत व्यावसायिकाने येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात सायबर गुन्हेगारांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

 

फिर्यादीने फेसबुकवर डिसेंबर 2021 मध्ये मोबाईल लोन अ‍ॅपद्वारे झटपट कर्ज मिळवा, अशी जाहिरात पाहिली होती. त्या जाहिरातीनुसार त्यांनी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करून त्याद्वारे कर्ज घेतले होते. ते कर्ज ऑनलाईन फेडूनही त्यांना पैशासाठी तगादा लावण्यात आला.

 

फिर्यादीने विविध लिंकच्या माध्यमातून 14 लाख 43 हजार 36 रूपये एवढी रक्कम देवूनही त्यांच्याकडे पैशासाठी तगादा लावण्यात आला. पैसे भरले नाही तर फिर्यादी व त्याच्या कुटूंबियांचे अश्लिल फोटो व्हायरल करण्याच्या धमक्या देण्यात आल्या. शिवीगाळ करण्यात आली. या सर्व त्रासाला कंटाळून सदर व्यावसायिकाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button