अहमदनगरलेटेस्ट

कोणत्या जिल्हापरिषद गटातून लढणार ? अक्षय कर्डीले म्हणाले…

अक्षय कर्डिले यांना राजकारणात लाँच करण्याची ही योग्य वेळ आहे पण माजी आमदार कर्डिले यांचे होम ग्राउंड मानले जाणारे नागरदेवळे आणि जेऊर दोन्ही गट राखीव झाले आहेत. अक्षय कर्डिले यांच्या लाँचिगची वेळ डावलायची नसेल तर तालुक्यातील वाळकी आणि दरेवाडी या खुल्या गटांशिवाय पर्याय नाही. वाळकी पेक्षा दरेवाडी जिल्हा परिषद गट प्रचारासाठी सोपा असल्याने अक्षय जिल्हा परिषद साठी दरेवाडी गटातून उतरण्याच्या तयारीत आहेत. कार्यकर्त्यांच्या मागणी खातर त्यांनी वाळकी आणि दरेवाडी दोन्ही गटांमधून चाचपणी सुरू केली आहे.

जिल्हा परिषद साठी रणांगणात उतरणार याबाबत अक्षय यांनी यापूर्वीच सूतोवाच केलेले आहे. तशी तयारीची त्यांनी नागरदेवळे आणि जेऊर या गटांमधून सुरू केली होती. पण आरक्षण सोडतीत हे दोन्ही जिल्हा परिषद गट राखीव झाले आहेत.

वाळकी जिल्हा परिषद गटांमधून महाविकास आघाडी राष्ट्रवादीचे बाळासाहेब हराळ आणि दरेवाडी जिल्हा परिषद गटातून शिवसेनेच्या संदेश कार्ले यांची उमेदवारी अंतिम आहे. आजपर्यंत झालेल्या ३ निवडणुकांमध्ये तेच विजयी झालेले आहेत.त्यांचा जनसंपर्क पहाता त्यांच्या विरोधात सर्व दृष्टीने सक्षम उमेदवार असावा अशी दोन्ही गटांतील कर्डिले समर्थकांची इच्छा आहे.

आजमितीला वाळकी गटामधून बाजार समिती चे माजी सभापती अभिलाष घिगे, दरेवाडी गटामधून बाजार समितीचे माजी सभापती हरिभाऊ कर्डिले, दीपक कार्ले यांनी तयारी सुरू केली आहे. हराळ किंवा कार्ले यांच्या विरोधात अक्षय कर्डिले सर्व दृष्टीने सक्षम असतील असे कर्डिले समर्थकांचे म्हणणे आहे.

वाळकी गटात १६ गावे आणि ३९ हजार मतदार आहेत. या गटाचा विस्तार हा अंबिलवाडी ते अकोळनेर असा झाला असल्याने प्रचाराच्या दृष्टीने अडचणींचा आहे. त्यामानाने दरेवाडी जिल्हा परिषद गट हा ११ गावांचा असून २९ हजार मतदार आहेत. सर्व गावे ही नगर शहरालगत असल्याने आमदार संग्राम जगताप यांचे कार्यकर्ते या भागात आहेत. बाजार समितीचे माजी सभापती भानुदास कोतकर यांचे समर्थकही या गावांमध्ये आहेत. त्याचाही फायदा मिळू शकतो.

मी उमेदवारी करावी यासाठी दरेवाडी ,वाळकी भागातून अनेक फोन येत आहेत.अनेक तरुण आणि कर्डीले साहेबांचे अनेक कार्यकर्ते भेटून आग्रह करत आहेत. पण अद्याप आपण कोणताही निर्णय घेतलेला नाही.जर कार्यकर्त्यांची इच्छा असेल आणि मनापासून साथ देणार असतील तर उमेदवारी करण्यास तयार आहे. जर संधी मिळाली तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून किती विकास कामे करता येऊ शकतात आणि दर्जेदार कामे कशी असतात हे नक्कीच दाखवून देऊ असा आत्मविश्वास अक्षय कर्डीले यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button