“मोक्का’तील फरार आरोपी अखेर जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दरोडा गुन्ह्यात ‘मोक्का’ कायद्यान्वये कारवाई करण्यात आलेल्या आरोपीला अटक केली. पवन युनूस काळे (रा. गुणवडी ता. नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
अधिक माहिती अशी, 1 ऑगस्ट 2021 रोजी पहाटे नगर-सोलापूर महामार्गावरील साकत (ता. नगर) शिवारातील पेट्रोलपंपावर दरोडा टाकून लुटमार केल्याची घटना घडली होती.
याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस तपासादरम्यान सदरचा गुन्हा भोसले टोळीने केल्याचे सिध्द झाले होते.
भोसले टोळीविरूध्द 30 डिसेंबर 2021 रोजी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी (मोक्का) कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. कुख्यात गुन्हेगार आजिनाथ भोसलेसह सहा आरोपींचा यामध्ये समावेश आहे.
यातील चार आरोपींना यापूर्वी अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील सुरेश काळे (रा. सोनविहीर ता. शेवगाव) व पवन काळे (रा. गुनवडी ता. नगर) हे पसार होते. त्यातील पवन काळे याला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अटक केली आहे.