अहमदनगर

पोलिसांना खोटी माहिती दिल्याने मिळाली जेलची हवा!

अहमदनगर- पोलिसांना खोटी माहिती देणे एका तरूणाच्या चांगलेच अंगलट आले आहे. श्रीरामपूर बस स्थानकात बॉम्ब व पिस्तुल घेऊन एक इसम आला असून तो नाशिकला जात आहे, अशी खोटी माहिती दिली म्हणून मंगळवारी श्रीरामपूर शहर पोलिसांनी तालुक्यातील खिर्डी येथील तरूणाला अटक केली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर सखाराम हुलगे (रा. खिर्डी) असे त्या तरूणाचे नाव आहे.

 

मंगळवार, 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी 05/30 वा. चे सुमारास डायल 112 या आपत्कालीन सेवेवर फोन करून प्रवाशांना त्रास देण्याचे उद्देशाने श्रीरामपूर बस स्थानकात बॉम्ब व पिस्तुल घेऊन एक इसम असून तो नाशिकला जात आहे, अशी खोटी माहिती किशोर सखाराम हुलगे याने दिली. पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ तेथे पोलीस पथक रवाना केले, सदर ठिकाणी नाशिककडे जाणार्‍या बस थांबवून बसमधील प्रवासी तसेच बस स्थानकात थांबलेल्या प्रवासी यांची झडती घेतली असता, असा कोणताही प्रकार आढळून आला नाही.

 

त्यानंतरही अजून दोन वेळा सदर इसमाने फोन करुन तीच खोटी माहिती डायल 112 ला दिली. त्यानंतर शिर्डी बस स्थानकात बॉम्ब असल्याची खोटी माहिती दिली. सदर इसमाने नंतर फोन बंद करून ठेवला होता. पोलिसांनी त्या तरूणाविरूध्द पोलिसांना व प्रवाशांना त्रास देण्याच्या उद्देशाने खोटी माहिती दिल्याचा गुन्हा दाखल केला आला. त्यानंतर त्याचा शोध घेऊन, त्यास दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button