Saturday, February 24, 2024
Homeअहमदनगरबिबट्याच्या हल्ल्यात शेळी गंभीर जखमी

बिबट्याच्या हल्ल्यात शेळी गंभीर जखमी

Ahmednagar News : कोपरगाव तालुक्यातील घारी येथे बिबट्याने भर वस्तीत येऊन शेळीवर हल्ला केला. त्यामुळे शेळी गंभीर जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, कोपरगाव तालुक्यात अनेक दिवसांपासून कुठल्या न कुठल्या गावात बिबट्याने पाळीव जनावरे फस्त केल्याच्या घटना घडत आहेत.

काही दिवसांपासून तालुक्यातील पश्चिम भागात असलेल्या चांदेकसारे, सोनेवाडी, देर्डे कोऱ्हाळे, घारी या गावांमध्ये बिबट्याचा धुमाकूळ सुरू असल्यामुळे पशुपालक व नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

काल गुरूवार (दि.१) सकाळी ६ वाजेच्या सुमारास घारी गावालगत पश्चिम दिशेला रहिवासी असलेले शेतकरी शांतीलाल साहेबराव होन यांच्या घराशेजारील जनावरांच्या गोठ्याजवळ बांधलेल्या शेळीवर बिबट्याने हल्ला केला व शेळीला गंभीर जखमी केले.

बाहेर जनावरांची ओरड झाल्यामुळे शांतीलाल होन यांचा मुलगा योगेश घाईघाईने बाहेर आला व बॅटरीच्या उजेडामुळे बिबट्या त्या ठिकाणाहून पळून गेला.

होन यांची वस्ती गावाच्या एकदम लगत आहे. बिबट्याचा भर वस्तीत गावात वावर वाढल्याने होन यांचे कुटुंब व आजूबाजूची कुटुंब व नागरिक भयभीत झाले आहेत. त्यामुळे गावात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.

बिबट्याच्या दहशतीत महावितरणची रात्री येणारी वीज शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर घालणारी आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग असताना रात्री घरातून बाहेर पडावे की नाही, याची सर्वांना चिंता आहे.

याबाबत वनविभागाच्या श्रीमती पडवळ यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. तसेच पशुसंवर्धन अधिकारी डॉ. निर्मळ यांनी भेट देऊन शेळीची तपासणी करून उपचार सुरू केले आहेत.

जखम गंभीर असल्यामुळे व अन्ननलिकेला इजा झालेली असल्यामुळे शेळीची परिस्थिती गंभीर आहे. एवढं करून उपचाराला प्रतिसाद दिला तरच शेळी वाचू शकते, अन्यथा शेळी वाचू शकणार नाही, असे डॉ. निर्मळ यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments