बिबट्याच्या हल्ल्यात घोड्यासह शेळी ठार; जिल्ह्यातील या ठिकाणची घटना

बिबट्याच्या हल्ल्यात 8 वर्षे वयाचा घोडा ठार झाल्याची धक्कादायक घटना राहाता तालुक्यातील आडगाव येथे घडली आहे. तसेच रांजणगाव खुर्दला बिबट्याच्या आणखी एका हल्ल्यात शेळी देखील ठार झाली आहे.
बिबट्याच्या वाढत्या हल्ल्याच्या घटनांमुळे पशुपालकांमध्ये मोठे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी, आडगाव बुद्रुक येथील बाबासाहेब दत्तू वराडे यांच्या मेंढ्यांसह एक 7 ते 8 वर्षांचा घोडा मोकळ्या जागेत बांधलेला होता.
अचानक बिबट्याने या घोड्यावर हल्ला करत त्याला ठार केले. हा प्रकार वराडे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या बिबट्याला पिटाळून लावले.
मात्र तो पर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात घोड्याचा जीव गेला होता. दरम्यान वनविभागाचे कर्मचारी संजय साखरे यांनी घटना स्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.
दरम्यान सोमवारी रात्री 11 वाजता रांजणगाव खुर्द येथील चैतन्य संजय गोर्डे यांच्या मालकीची शेळी बिबट्याने फस्त केली आहे. बिबट्याने शेळीवर हल्ला करून तीला फस्त केले.
वनकर्मचारी संजय साखरे यांनी गोर्डे यांच्या शेडला भेट देऊन शेळीचा पंचनामा केला आहे. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे पशुपालक कमालीचे चिंतेत सापडले आहे. वनविभागाने या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिक करू लागले आहे.