नगर शहर सहकारी बँकेच्या आणखी कर्ज खात्यातील सोने आढळले बनावट

अहमदनगर- अहमदनगर शहर सहकारी बँक बनावट सोने तारण घोटाळा प्रकरणी आणखी ११ कर्ज खात्यातील सोने बनावट असल्याचे समोर आले आहे. चेक केलेल्या सोन्याचे वजन 2495.40 ग्रॅम इतके असून फसवणूक झालेली रक्कम 89,14,000/- इतकी आहे. तसेच आजपर्यंत एकूण 8520.40 ग्रॅम वजनाचे बनावट सोने तारण ठेवून रुपये 3 कोटी 9 लाख 27 हजार ची फसवणूक केली आहे.
शहर सहकारी बँक बनावट सोने तारण कर्ज प्रकरण गुन्ह्यातील अटक आरोपी अजय कपाले, सुनील आळकुटे, विशाल चीपाडे, ज्ञानेश्वर कुताळ, श्रीतेश पान पाटील यांना आज न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.
बनावट सोनेतारण प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी शहर सहकारी बँकेची बनावट सोनेतारण प्रकरणातून फसवणूक झाल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. २ कोटी ७० लाखांचे मूल्य असलेले सुमारे ६ किलो बनावट सोने ठेवून २.२३ कोटींचे कर्ज घेण्यात आल्याचे तपासात समोर आले होते. आता शहर बँकेतीलच आणखी ११ खात्यांमध्ये बनावट सोने आढळले आहे. या बनावट दागिन्यांचे आधारे ७९.१४ लाख रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. त्यामुळे फसवणुकीचा आकडा ३ कोटींपेक्षाही अधिक झाला आहे.
दरम्यान, आरोपींच्या घर झडतीमधून पोलिसांना महात्मा फुले पतसंस्था व नागेबाबा पतसंस्थेच्या सोनेतारण कर्ज प्रकरणासंदर्भातील काही पावत्या मिळाल्या होत्या. तसेच इतरही काही बँका व पतसंस्थांमध्ये बनावट सोने ठेवून कर्ज घेतल्याची माहिती आरोपींच्या तपासातून समोर आलेली आहे. सदर सहा ते सात बँका व पतसंस्थांना पत्र पाठवून त्यांच्याकडील सोनेतारण कर्जाची तपासणी करण्याच्या व पोलिसांना माहिती सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यातील नागेबाबा पतसंस्थेकडून पोलिसांशी संपर्क साधण्यात आला आहे. आज (शुक्रवारी) नागेबाबा पतसंस्थेतील कर्ज खात्यांची तपासणी केली जाण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली.