शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: ऊस पिकाची नोंद होणार अॅपद्वारे

अहमदनगर – राज्यातील साखर कारखान्यांच्या शेती विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी शेतकर्यांना ई-पीक पाहणी अॅप वापराकरीता माहिती व प्रशिक्षणाची कार्यवाही करून शेतकर्यांनी स्वतः गाव नमुना नंबर 12 (सात-बारा) मध्ये लागवड झालेल्या ऊस पिकांच्या नोंदी ई-पीक पाहणी अॅपद्वारे कराव्यात, अशा सूचना साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी साखर कारखान्यांना दिल्या आहेत.
साखर आयुक्तालयाने काढलेल्या परिपत्रकात म्हटले, महसूल व वनविभागाच्या पीक पाहणी प्रकल्पाची सर्व ऊस उत्पादक शेतकर्यांनी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने दि. 30 जुलै 2021 च्या शासन निर्णयान्वये ई-पीक पाहणी प्रकल्प दि.15 ऑगस्ट 2021 पासून राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. शासन निर्णयानुसार गठीत करण्यात आलेल्या राज्यस्तरीय सनियंत्रण समितीच्या दि.20 ऑगष्ट 2021 रोजीच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार साखर कारखान्याच्या शेती विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी शेतकर्यांना ई-पीक पाहणी अॅप वापराकरीता माहिती व प्रशिक्षण देण्याची कार्यवाही करावयाची आहे. शेतकर्यांनी स्वतः गावनमुना नंबर 12 (सातबारा) मध्ये पेरणी-लागवड झालेल्या पिकांच्या नोंदी भ्रमणध्वनीवरील ई-पीक पाहणी अॅपद्वारे करावयाच्या आहेत.
सर्व साखर कारखान्यांनी मोहीम स्वरूपात आपल्या कारखान्याकडे नोंद झालेल्या ऊस उत्पादक शेतकर्यांकडून ई-पीक पाहणी अॅपद्वारे गाव नमुना नंबर 12 ( सात बारा) मध्ये ऊस पिकाच्या नोंदी करून घ्याव्यात. असे केल्याने अचूक ऊस पीक क्षेत्राचा अंदाज करता येईल, कारखान्यांनाही नक्की किती ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल, याची अचूक माहिती मिळेल. या अॅपच्या माध्यमातून ऊस नोंदणीची कार्यवाही सुलभतेने होण्यास सर्व कारखान्यांना यापुढे मदत होणार आहे.
कारखान्यांना ऊस नोंदणी करीता लागणार्या मनुष्यबळात देखील यामुळे कपात होऊ शकेल. सर्व सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालक व खासगी साखर कारखान्यांचे जनरल मॅनेजर यांनी सर्व ऊस उत्पादक शेतकरी ई-पीक पाहणी अॅपमध्ये ऊस पिकाच्या नोंद घेतील, याकरीता शेती विभागाच्या कर्मचारी अधिकारी यांना नियोजनबद्ध कार्यक्रम आखून द्यावा. साखर कारखान्यांच्या शेती विभागा मार्फत उसाच्या नोंदी ई-पीक पाहणी अॅपद्वारे करण्यासाठी शेतकर्यांना कारखाना स्तरावर व कारखान्याच्या गटऑफिस स्तरावर अँड्रॉइड मोबाईल अॅप सुविधा उपलब्ध करून द्यावी.
साखर कारखान्याकडे नोंद झालेल्या कार्यक्षेत्रातील व कार्य क्षेत्राबाहेरील शेतकर्यांच्या ऊस पिकाची नोंद ई-पीक पाहणी अॅपमध्ये करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत. याकामी महसूल विभागाचे तलाठी तसेच कृषी विभागाचे कृषी सहाय्यक यांचे सहकार्य घ्यावे. अधिक माहितीसाठी संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांचेशी संपर्क करावा.