Government Medical College : अहमदनगरमध्ये जागेविना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेचे काम रखडले, क्रांतीसेना पक्षाकडून जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
अहमदनगरमध्ये नवीन शासकीय महाविद्यालय स्थापन होणार आहे. मात्र अद्याप याठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही.

Government Medical College : अहमदनगरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याकरिता २८ जून २०२३ रोजी कॅबिनेट बैठकीत वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालयामार्फत मंजूरी मिळाली आहे. मात्र जागेविना याठिकाणी नवीन महाविद्यालय बांधण्याचे काम रखडले आहे.
क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा म्हणून अहमदनगरची ओळख आहे. नगरमध्ये गोरगरीब कुटुंबांची संख्या अधिक आहे. असे असताना केवळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नसल्या कारणाने येथील लोकांना उपचारासाठी पुणे तसेच घाटी रुग्णालय संभाजीनगर याठिकाणी जावे लागते. पुणे व नगरचे अंतर पाहता लोकांना पुण्याला जाऊन उपचार घेण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या कारणाने कॅबिनेट बैठकीत वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालयामार्फत अहमदनगरसह एकूण ९ जिल्ह्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेची मान्यता मिळाली आहे. त्यानुसार नगरमध्ये एकूण १३ एकर जागेची आवश्यकता आहे.
याबाबत अखिल भारतीय क्रांतीसेना पक्षाचे मधुकर म्हसे पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र दिले आहे. त्यांनी या पत्रात कॅबिनेट बैठकीत झालेल्या निर्णयानुसार अजूनही नगरमध्ये महाविद्यालयासाठी जागा उपलब्ध होत नसल्याचे सांगितले आहे. तसेच जागा मिळत नसल्याने त्यांनी यावेळी खंत व्यक्त केली आहे.
यासोबतच कोरोना काळात दवाखाना मिळत नसल्याने अनेक रुग्णांची गैरसोय झाली होती. आणि आपत्कालीन परिस्थितीत केवळ रुग्णालय मिळत नसल्याने अनेक रुग्णाचा मृत्यू देखील झाला आहे.
तसेच याठिकाणी दररोज दोन हजार ते तीन हजार रुग्ण उपचारासाठी येत असतात. मात्र त्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे रुग्णाच्या दृष्टीकोनातून विचार करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेकरिता जागा मिळावी अशी विनंती म्हसे पाटील यांनी केली आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून अहमदनगरसह बुलढाणा, अमरावती, वर्धा, भंडारा, नवी मुंबई, पालघर, जालना, गडचिरोली, वाशीम, ठाणे या जिल्ह्यांना मंजुरी मिळाली आहे.