पोलीस ठाण्यात राडा करणे भोवले; ‘त्या’ दोन कर्मचार्यांची मुख्यालयात बदली

अहमदनगर- काही दिवसांपूर्वी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात वाद करणे दोन पोलीस कर्मचार्यांना चांगलेच भोवले आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी त्यांच्यावर कारवाई करून त्यांची बदली पोलीस मुख्यालयात केली आहे.
पोलीस कर्मचारी आर.के.दहिफळे व बी.जी.खेडकर यांच्यावर ही कारवाई झाली आहे. त्यांनी ठाणे अंमलदार कक्षात वाद केले होते. याची चौकशी करून याबाबत अहवाल पोलीस अधीक्षक ओला यांना सादर झाला होता. त्यांनी त्या दोन कर्मचार्यांवर कारवाई केली आहे.
30 नोव्हेंबर, 2022 रोजी रात्री या दोन अंमलदारांमध्ये पोलीस ठाणे अंमलदार यांच्या कक्षात वाद झाले होते. यासंदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी तशी नोंद स्टेशन डायरीला केली होती. ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत होती. तसा अहवाल निरीक्षक देशमुख यांनी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांच्याकडे सादर केला होता. उपअधीक्षक पाटील यांनी चौकशीअंती अहवाल पोलीस अधीक्षक ओला यांना पाठविला होता. यावर अधीक्षक ओला यांनी निर्णय घेत अंमलदार दहिफळे व खेडकर यांची नेमणुक पोलीस मुख्यालयात केली आहे.