Havaman Andaj : अरबी समुद्रात चक्रीवादळ; समुद्र खवळणार ! बळीराजाच्या चिंतेत वाढ

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ तयार होत आहे. याचा परिणाम मान्सूनच्या गतीवर होणार असून राज्यात मोसमी पाऊस ४ ते ५ दिवस लांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
चक्रीवादळामुळे नैऋत्य अरबी समुद्र, कर्नाटक- गोवा महाराष्ट्र किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच महाराष्ट्र गोवा किनारपट्टीवर पावसासह सोसाट्याचा वारा वाहणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. दक्षिण पूर्व अरबी समुद्रावर हे चक्रीवादळ तयार झाले आहे.
राज्यात मान्सूनपूर्व पाऊस सुरू
राज्यात मान्सूनपूर्व पाऊस सुरू आहे. मंगळवारी राज्यातील काही भागांत पावसाने हजेरी लावली. कोकणातील डहाणूमध्ये २ मिमी, विदर्भातील अमरावतीमध्ये ७ मिमी पावसाची नोंद मंगळवारी सायंकाळपर्यंत झाली.
दरम्यान, ७ ते १० जूनदरम्यान कोकणात किनारपट्टीवर पावसासह सोसाट्याचा वारा वाहणार आहे. तसेच मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात याचदरम्यान तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
विदर्भात हवामान कोरडे राहणार आहे. मंगळवारी राज्यात सर्वात जास्त तापमान • ब्रह्मपुरीमध्ये ४३.८ अंश सेल्सिअस, तर सर्वात कमी तापमान महाबळेश्वरमध्ये १७.६ अंश सेल्सिअस होते.