अहमदनगर

चार कट्टे घेऊन विक्री करण्यासाठी आला अन् पोलिसांच्या सापळ्यात अडकला

अहमदनगर – नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील, पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना अहमदनगर जिल्ह्यातील अवैध अग्निशस्त्रे व हत्यारे बाबत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

त्यानुसार निरीक्षक कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने विक्री करण्याच्या उद्देशाने चार गावठी कट्टे व आठ जिवंत काडतुसे बेकायदेशिररित्या कब्जात बाळगणार्‍या सराईत गुन्हेगाराला अटक केली. महेश काशिनाथ काळे (वय 26 रा. जामगाव ता. गंगापूर जि. औरंगाबाद) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्याकडून चार कट्टे, आठ काडतुसे, दुचाकी, मोबाईल व सॅक असा दोन लाख 24 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शेंडी (ता. नगर) शिवारात पोलिसांनी ही कारवाई केली.

पोलीस अंमलदार संदीप पवार यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून महेश काळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक इसम शेंडी बायपास, पांढरीपुल परिसरात गावठी कट्टे विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती निरीक्षक कटके यांना मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

पकडण्यात आलेला महेश काळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरूध्द अहमदनगर व औरंगाबाद जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात दरोडा, खूनाचा प्रयत्न, जबर दुखापत करणे, वाळु चोरी, अवैध अग्निशस्त्र बाळगणे असे गंभीर स्वरूपाचे 10 गुन्हे दाखल आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button