अहमदनगर

गोदावरी नदीवरील ‘हे’ धरण भरले; 18 दरवाजे उघडले

अहमदनगर- पैठण येथील जायकवाडी जलाशयातील पाणीसाठा काल 4 वाजता 90.02 टक्के झाल्यानंतर सायंकाळी 6 वाजे नंतर या धरणाचे 18 दरवाजे अर्ध्या फुटाने उचलण्यात येऊन या धरणातून गोदावरीत विसर्ग सोडण्यात आला आहे. या दरवाजातून 9432 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जलविद्युत प्रकल्पातील दरवाजातून 1589 क्युसेक व उजव्या कालव्यातून 600 क्युसेक असा एकूण 11521 क्युसेकने विसर्ग करण्यात येत होता. त्यामुळे गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

 

नाशिक जिल्ह्यातील धरणं यंंदा जुलैच्या पहिल्याच पंधरवड्यात भरली. त्यामुळे या धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येऊ लागल्याने गोदावरीतून 42 टीएमसी हून अधिक पाणी जायकवाडी जलाशयात काल सोमवार पर्यंत दाखल झाले. प्रवरा नदीचे काही प्रमाणात पाणी दाखल झाले. मराठवाड्यातील पावसाने व अन्य भागातूनही पाणी दाखल झाल्याने काल सायंकाळी 4 वाजता हे धरण 90 टक्के भरले. त्यामुळे औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व अन्य जायकवाडी प्रकल्पाचे अधिकारी यांचे उपस्थितीत या धरणातून खाली गोदावरीत 6 ते 6.30 वाजण्याच्या दरम्यान जायकवाडीचे 18 गेट अर्ध्या फुटाने उचलण्यात आले.

 

10 ते 27 क्रमांकाचे या 18 गेट मधून पाणी सोडण्यास सुरुवात झाली. 9432 क्युसेक ने विसर्ग करण्यात सुरुवात झाली. जलविद्युत प्रकल्प व उजवा कालवा असे एकूण 11 हजार 521 क्युसेक ने विसर्ग सुरु करण्यात आला. गेल्या 15 वर्षात जायकवाडी जुलै महिन्या मध्येच दुसर्‍यांदा भरले आहे. या विसर्गात टप्प्या टप्प्याने वाढ होवु शकतो. त्यामुळे विसर्गात वाढ होणार आहे.

 

दरम्यान गोदावरी नदीतून काल सायंंकाळी सहा च्या आकडेवारी नुसार 20776 क्युसेने विसर्ग जायकवाडीच्या दिशेने सुरु होता. काल दिवसभरात पावसाने पुन्हा दडी मारल्याने विसर्ग पुन्हा काहीसे घटविण्यात आले आहेत. दारणाचा विसर्ग 7244 क्युसेकवरुन काल सायंकाळी 6 वाजता 4340 क्युसेकवर आणण्यात आला आहे. तर गंगापूरचा विसर्ग काल 5 वाजता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपासून सुरु असलेला मुकणेचा विसर्गही काल सायंकाळी 6 वाजता बंद करण्यात आला आहे.

 

काल सायंकाळी 6 च्या आकडेवारी नुसार दारणातून 4340 क्युसेक, कडवातून 1396 क्युसेक, वालदेवीतून 341 क्युसेक, आळंदीतून 687 क्युसेक, भोजापुर मधून 450 क्युसेक, पालखेड मधून 3008 क्युसेक हे विसर्ग खाली नांदुरमधमेश्वर बंधार्‍यात दाखल होत असल्याने गोदावरीत 20776 क्युसेक ने विसर्ग करण्यात येत होता. काल सकाळी 6 पर्यंत गोदावरीत जायकवाडीच्या दिशेने या बंधार्‍यातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. काल धरणक्षेत्रात पावसाच्या हलक्या सरी होत्या. पावसात जोर नसल्याने नवीन पाण्याची आवक कमी झाली होती. काल सकाळी 6 ते सायंकाळी या 11 तासांत गंगापूरला अवघा 1 मिमी, अंबोलीला 14 मिमी, .त्र्यंबक 4 मिमी, गौतमी 4 मिमी, कश्यपी 2 मिमी असा किरकोळ पाऊस पडला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button