अहमदनगर

त्यानं टोळी करून सुरू केला ट्रॅक्टर, ट्रॉली चोरीचा धंदा; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

अहमदनगर- बीड जिल्ह्यातील एकाने टोळी करून ट्रॅक्टर, ट्रॉली चोरी करण्याचा उद्योग सुरू केला. त्याला शेवगाव पोलिसांनी बीड येथून शिताफीने जेरबंद केले आहे. त्याच्यासह साथीदारांकडून 5 गुन्ह्यातील ट्रॅक्टर व ट्रॉलीसह एकूण 21 लाख 15 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे.

 

भारत अशोक चितळकर (रा. गुंतेगाव, ता. गेवराई, जि.बीड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील तीन ते चार महिन्यांपासून शेवगाव तालुक्यातील आखेगाव, वाडगाव, सुकळी, हसनापूर, आव्हाणे येथून ट्रॅक्टर व ट्रॉली चोरीच्या घटना घडल्याने चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

 

यामध्ये फिर्यादी योगेश बाबासाहेब गरड (रा. सुकळी, ता. शेवगाव) 6 लाख रुपये किंमतीचा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर, विक्रम धोडींबा जवरे (रा.वाडगाव, ता. शेवगाव) यांचा 60 हजार रुपये किंमतीची ट्रॉली, विठ्ठल विक्रम ढाकणे (रा. हसनापुर, ता.शेवगाव) यांच्या 1 लाख 95 हजार रुपये किंमतीच्या 2 ट्रॉली, सुधाकर भिवसेन काटे (रा. आखेगाव, ता.शेवगाव) यांची 60 हजार रुपये किंमतीची एक ट्रॉली, रंजित अशोक बेळगे (रा.वाळुज, ता.पाथर्डी) यांचा 2 लाख रुपये किंमतीचा एक स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर यांचा समावेश होता.

 

पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी अधिकारी व कर्मचार्‍यांची 3 पथके तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी तपास चालू केला होता. तसेच गुप्त बातमीदारामार्फत माहिती काढून संशयित गणेश झिरपे (रा.कोळगाव ता.शेवगाव) यास सापळा रचून ताब्यात घेतले. त्याचेकडे वरील ट्रॅक्टर व ट्रॉलीबाबत चौकशी केली असता चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.

 

तसेच त्याने दिलेल्या माहितीवरून संशयित संजय खर्चन ( रा.आखेगाव, ता.शेवगाव) यास अटक केली. तर या टोळीचा मोहोरक्या भारत अशोक चितळकर बीड जिल्ह्यातील गुंतेगाव येथे सापळा रचून पोलिसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद केलेे. तर या टोळीतील संशयित सचिन गोर्डे व लाला गोर्डे (रा.गुंतेगाव ता.गेवराई, जि.बीड) हे दोन संशयित अद्याप फरार आहेत.

 

उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पालीस निरीक्षक विलास पुजारी, सहायक निरीक्षक विश्वास पावरा, कर्मचारी आशिष शेळके, राजू ढाकणे, खेडकर संपत, सचिन खेडकर, खेडकर रामहरी, सचिन शेळके यांनी परिश्रम घेतले. पोलीस निरीक्षक विलास पुजारी व कर्मचार्‍यांचे शेतकरी वर्गातून या कारवाईसाठी अभिनंदन केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button