चेहर्यावर हात फिरविला अन् अडीच लाखांचे दागिने घेतले काढून; वृध्दाची अशी केली फसवणुक

अहमदनगर- ‘शिवमंदीर किधर है’, असा पत्ता विचारण्याचा बहाणा करून एक हात वृध्दाच्या चेहर्यावर फिरवला आणि अडीच लाखांचे दागिने काढून घेत फसवणुक केली.
नगर-पुणे महामार्गावर चारचाकीतून आलेल्या व्यक्तींनी वृध्द दुचाकीस्वाराला भुरळ पाडत त्याचे दागिने लंपास करत फसवणुक केली आहे.
या प्रकरणी रसिकलाल घिवरचंद बोकरीया (वय 72, रा. गणपती मंदीराजवळ, अंबिकानगर, केडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
27 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.30 ते 2.45 वाजण्याच्या सुमारास बोकरिया हे नगर पुणे रोडवरून जात असताना परफेक्ट टायर शोरूम शेजारी काळ्या रंगाच्या गाडीतून आलेल्या व्यक्तींनी त्यांना आवाज दिल्याने ते थांबले. गाडीत डोक्याला भस्म लावलेले व्यक्ती होते. त्यातील एक साधूच्या वेशातील व्यक्तीने त्यांना शिवमंदीर किधर है, असा पत्ता विचारण्याचा बहाणा करून एक हात त्यांच्या चेहर्यावर फिरवला.
त्यानंतर बोकरीया यांच्या हातातील ब्रेसलेट व सोन्याची चेन नसल्याचे त्यांच्या लक्षात आले ते त्यांनी पाहिले असता सदरची गाडी निघून गेलेली होती. त्यामुळे अज्ञात चोरट्यांनी भुरळ पाडून अडीच लाख रूपये किंमतीचे हातातील ब्रेसलेट व गळ्यातील सोन्याची चेन चोरून नेल्याची फिर्याद त्यांनी दिली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.