अहमदनगर

अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ बहुचर्चित हत्याकांड प्रकरणी सुनावणीला सुरूवात

अहमदनगर- नेवासा येथील बहुचर्चित अ‍ॅड. रियाज पठाण हत्याकांड प्रकरणी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.आर. नाईकवाडी यांच्यासमोर ही सुनावणी सुरू झाली आहे.

 

मंगळवारी सरकार पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्वल निकम यांनी न्यायालयात हजेरी लावून तीन साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या. नेवासा येथील एक डॉक्टर, शवविच्छेदन करणारे डॉक्टर व आणखी एका साक्षीदाराची साक्ष नोंदवली. याप्रकरणी पुढील सुनावणी 8 ऑगस्ट रोजी ठेवण्यात आली आहे.

 

अण्णा लष्करे खून प्रकरणात आरोपींच्या बाजूने साक्ष दिल्याच्या कारणातून 16 सप्टेंबर 2013 रोजी नेवासा तहसील कार्यालयाच्या आवारात अ‍ॅड. रियाज जमशेद पठाण यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी 12 ते 13 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील काही आरोपींना जामीन मिळाला असला तरी बहुतांश आरोपी अद्यापही कोठडीतच आहेत.

 

दरम्यान, सुनावणीवेळी आरोपींना विशेष पोलीस बंदोबस्तात न्यायालयात आणण्यात आले होते. अ‍ॅड. पठाण हत्याकांड प्रकरणी सुनावणी सुरू झाली असून ती प्राथमिक टप्प्यात आहे. तीन साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या असल्याचे अ‍ॅड. निकम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. अ‍ॅड. निकम यांना अ‍ॅड. परिमल फळे यांनी सहाय्य केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button