येत्या दोन दिवसांत जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज

जून महिन्याच्या प्रारंभीच तब्बल दोन इंच पावसाची नोंद कोपरगावात झाली. येत्या काही दिवसांत आणखी मान्सूनपूर्व सरी बरसण्याची शक्यता आहे. शहर व तालुक्यात चार तास पाऊस झाला.
५२ मिलिमीटर पाऊस पडल्याची पाटबंधारे खात्याने केली, जेऊर कुंभारी हवामान केंद्रावर ३० मिलिमीटरची नोंद झाली. सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता सुरू झालेला पाऊस रात्री साडेदहा वाजता थांबला.
दोन तास जोरदार, तर दोन तास मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होता. त्यातच विजेचा लपंडाव सुरू झाला. पाच तास वीज गायब होती. रात्री अकराला वीज पुरवठा पूर्ववत झाला.
पावसाबरोबर सोसाट्याचा वारा वहात होता. त्यामुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या मोडून पडल्या. प्लास्टिकची तावदाने उडून गेली. शहरातील सखल भागात पाणी साचले.
शेतात काढून ठेवलेला कांदा, मिरच्या, लसूण आदी पिके काही प्रमाणात भिजली. ती झाकण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. येत्या दोन दिवसांत काही भागात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
चक्रीवादळाने अनेक ठिकाणी जोरदार तडाखा दिला आहे. महावितरण कंपनीने वीजवाहक तारांलगत असलेल्या झाडांच्या फांद्यांची छाटणी नुकतीच केली आहे, तरीही तारा घासून वीजप्रवाह वारंवार खंडित होतो.
पावसामुळे आल्हाददायक वातावरण तयार झाले आहे. हवेतील उष्णता कमी होऊन सुखद गारवा निर्माण झाला. पावसात भिजण्याचा आनंद अनेकांनी घेतला. काहींनी घरांच्या गच्चीवर मनमुराद नाचत पावसाच्या आगमनाचे स्वागत केले.