नगर-मनमाड रस्त्यावरील अवजड वाहतुक ‘या’ तारखेपर्यंत बंदच राहणार

अहमदनगर- भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी नगर- मनमाड महामार्गावरील विळद बायपास चौक ते पुणतांबा फाटा दरम्यानची अवजड वाहतुक पर्यायी मार्गाने वळविणेबाबत विनंती केलेली होती. त्यानुसार अवजड वाहतुक 16 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान बंद करण्यात आली होती.
दरम्यान अद्यापही दुरूस्तीचे काम बाकी असल्याने 12 नोव्हेंबरपर्यंत नगर-मनमाड मार्ग अवजड वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. तसा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी काढला आहे.
विळद बायपास चौक ते पुणतांबा या मार्गावर प्रचंड प्रमाणात अवजड वाहतूक सुरू असल्यामुळे दुरूस्तीच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात व्यत्यय येवून वाहतूक कोंडी होत होती. रस्त्यावरून अवजड वाहने लगेच जात असल्यामुळे पुन्हा रस्ता खराब होत होता. त्याचप्रमाणे अवजड वाहनांमुळे अपघात होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टीने वाहतुक बंद ठेवण्यात आली आहे.
सदर आदेशातून ऊस वाहतुक करणारी वाहने (ट्रक, ट्रॅक्टर व अन्य वाहने) यांना सुट देण्यात आली आहे. विळद बायपास ते नांदगाव (ता. नगर) पर्यंत दुरूस्तीचे काम पुर्ण झाले आहे. वांबोरी फाटा ते राहुरी, कोल्हार बस स्थानक, बाभळेश्वर टोलनाक्याजवळ व पिंपरी निर्मळ या ठिकाणी काही प्रमाणात दुरूस्तीचे काम बाकी आहे. यामुळे सदर दुरूस्तीकामासाठी अवजड वाहतुक वळविण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.