कापूस दरवाढीची आशा मावळली; कारण…

अहमदनगर- कापूस दरावर शासनाने अंकुश ठेवण्याची गरज असताना व्यापारी कमी भावात शेतकर्यांकडून कापूस खरेदी करीत आहे. शेतकर्यांना सध्या शेतीसाठी व दैनंदिन गरजा भागविण्यासाठी पैसे उपलब्ध करत असताना आपला सोन्यासारखा कापूस कमी दराने विकावा लागत आहे.
जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकर्यांना कापूस दराविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. कापूस दर दहा हजारांचा टप्पा पार करून शेतकर्यांना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होईल अशी आशा असताना कापूस दरात रोज चारशे ते पाचशे रुपयांची घट दिसून येत असून त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
यात व्यापारी मालामाल झाल्याचे दिसून येत आहे. आपल्या भागात कापूस क्षेत्र यावर्षी भरपूर प्रमाणात होते, पण परतीच्या पावसाने सगळ्या जास्त मोठ्या नुकसान हे कापूस पिकांचे झाले. त्यात कापूस उत्पादनावर ही मोठा परिणाम झाला. त्यामुळे उत्पादन कमी झाले असेल तरी भाव चांगला मिळून उत्पादन खर्च निघून या आश्यावर शेतकरी तग धरून होता.
पण कापूस दर वाढण्याचे चिन्ह सध्या तरी शेतकर्यांना दिसून येत, रोज शेअर बाजारप्रमाणे कापूस दर कमी होत आहे. शेतकर्यांना पैशाची आवश्यकता असताना कापूस कमी दराने विकावा लागत आहे. ऑक्टोबर व डिसेंबरच्या सुरुवातीला कापूस दर साडेनऊ हजार रुपयांपर्यंत होते, त्यात भावात आणखी सुधारणा होऊन दहा हजार रुपये टप्पा पार होईल, अशी अपेक्षा असताना दर कोसळत गेले आणि आज अखेर प्रतिक्विंटल सात हजार सहाशे ते सातशे रुपये दर चांगल्या प्रतीच्या कापसाला मिळत आहे. त्यामुळे सरकारने कापूस दराविषयी लक्ष केंद्रित करून दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी करीत आहे.
शेतकर्यांनी आपल्या शेतातील कापूस वेचून दर वाढण्याच्या अपेक्षेने साठवून ठेवला. पण दर सतत कोसळत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. त्यात वेचलेल्या कापसाचे वजन निम्याने घटले आहे. कापूस वेचणीसाठी प्रतिक्विंटल जवळपास पंधराशे ते सोळाशे रुपये मोजावे लागले. शेवटच्या वेचणीला तर भाव प्रतिक्विंटल वेचणीचा खर्च क्विंटलला दोन हजार रुपयांपर्यंत गेला. त्यामुळे कापसाचे वजन घटले व भाव मिळत नसल्याने कापूस पिकाची खर्च वसूल होतो की नाही असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे.