अहमदनगर कल्याण महामार्गावर भीषण अपघात ! तरुणीसह महिलेचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर जखमी

अहमदनगर-कल्याण महामार्गावरील ओतूर (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत ढमाले मळा जवळील कृष्णकुंज निवाससमोर कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या पीकअप टेम्पो (एमएच १४ एचयु ३०६९) ने दुचाकी (एमएच ०७ बी २७७२) ला जोरदार धडक दिली.
जुन्नर तालुका हद्दीत नगर- कल्याण महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. ओतूर परिसरात असणाऱ्या कोळमाथा या ठिकाणी एका पायी चाललेल्या युवतीला आणि तिथून दुचाकीवर चाललेल्या पती-पत्नीला पिकअप वाहनाने एकाच वेळी धडक दिल्याने या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे.
ऋतुजा अशोक डुंबरे (वय १९) आणि सविता गीताराम तांबे (वय ४५) या दोघींचा या अपघातात मृत्यू झाला असून गीताराम नामदेव तांबे (वय ५२) हे जखमी झाले आहेत. अपघातातील मृत आणि जखमी यांची घरे महामार्गापासून हाकेच्या अंतरावर आहेत.
कल्याण-नगर महामार्गावर धावणाऱ्या वहानांपैकी पीकअप वाहन चालक हल्ली वेगाची मर्यादा ओलांडून पिकअप गाडी वेगात पळवत असतात. त्यामुळे अलीकडच्या काळात पिकअपच्या अपघातामध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे.
हा भीषण अपघात मंगळवारी (दि. १९) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुरेश गेंगजे व शामसुंदर जायभाये हे घटनास्थळी तात्काळ दाखल झाले.
मृत ऋतुजा डुंबरे ही रस्त्याने घरी चालत जात होती, तर गीताराम नामदेव तांबे व पत्नी सविता तांबे हे दोघे पती-पत्नी आळेफाट्याच्या दिशेने मोटारसायकलवरून जात होते. त्यावेळी रस्त्याने भरधाव वेगात चाललेल्या पिकअप एम. एच. १४ के. ए ५१३७ हा कल्याणच्या दिशेने जात होता.
मात्र ओतूर परिसरातील कोळमाथा येथे असणाऱ्या दत्तभेळ हॉटेलसमोर रस्त्याने चाललेल्या युवतीला आणि दुचाकीवर चाललेल्या पती पत्नीला पिकअपने धडक दिली. अपघातानंतर पिकअप वाहन रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पलटी झाली.