मी मैत्री जपली, पण राहूल जगतापांनी गद्दारी केली ! करारा जबाब मिलेगा…..

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत झालेल्या घडामोडीनंतर माझ्याबद्दल वेगळी चर्चा केली जात आहे. मी अजिबात मोठा नाही, पण स्वर्गिय सदाअण्णांचा मुलगा असल्याने मी चर्चेत आहे. मी खुलासा करावा की नाही या द्विधा मनस्थितीत होतो, पण राहूल जगताप व त्यांची टीम ज्या पध्दतीने माझ्याशी वागली आणि मी जवळून त्यांची गद्दारी पाहिली हे सगळे तुमच्यासमोर यावे म्हणून मी माझ्या भावना या पोस्टमधून व्यक्त करीत आहे.
बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्यानंतर राहूल जगताप यांनी माझे मित्र बाळासाहेब नाहाटा यांना माझ्याकडे पाठवले. ग्रामपंचायत मतदारसंघात त्यांचा एकही उमेदवार निवडून येणार नसल्याने तुमच्याशिवाय पर्यायच नाही असा आग्रह करुन मी उमेदवारी करावी असा आग्रह राहूल जगताप यांनी धरला.
आणि त्यातूनच मी ग्रामपंचायत मतदारसंघात उमेदवारी करावी अशी गळ घातली. मितेश नाहाटा यांनीही उमेदवारी करावी अशी चर्चा सुरु झाली आणि माझी इच्छा नसताना मी बाजार समितीच्या निवडणूकीत उतरलो. त्यातच माझे मित्र सचिन चौधरी यांच्या पत्नीला राजापुर गावचे सरपंच करु असा शब्द राहूल जगताप यांनी देत लगेच त्यांच्या कार्यकर्त्याचा राजीनामा घेतो असे सांगितले. पण प्रत्यक्षात हा ‘शब्द’ पाळला नाहीच. शब्द द्यायचा तर तो पाळायचा असतो हे राहूल जगताप यांना माहिती दिसत नाही.
शब्द कसा पाळायचा हे आमच्याकडून शिका यापुढे आम्ही दाखवून देवू. मितेश माझा मित्र आहे. त्याच्यासाठी सगळे पणाला लावले. पण राहूल जगताप व त्यांच्या टीमने माझ्यासह मितेशला पाडण्यासाठी सर्व प्रकारची ताकत खर्च केली. मला निवडणूकीपुर्वी ग्रामपंचायत मतदारसंघात त्यांची ४१६ मतांची बेरीज असणारी यादी दाखवली होती. प्रत्यक्षात मला ३९८ व मितेशला ३३४ मतेच मिळाली. यात माझ्या वडीलांच्या उपकाराची जाण ठेवून माझे चुलते आमदार बबनराव पाचपुते यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी १७० क्राॅस मते मला दिली. म्हणजे राहूल जगताप यांची नेमकी किती मला मिळाली याचा हिशोब तुम्ही करा…..
माझे वडील सदाअण्णा आज हयात नाहीत. मला काष्टीने सरपंच केले हे राहूल जगताप व त्यांच्या बलगबच्च्यांना पाहवले नव्हते. ज्या अण्णांनी आयुष्यभर संघर्ष केला त्यांच्या मुलाला बाजार समिती निवडणूकीत उभे करुन कायमचे संपविण्याचा प्रयत्न झाला पण वडीलांची पुण्याई कामाला आली आणि मी तरलो आणि माझा मित्र मितेश मात्र पडला नव्हे तर पाडला गेला. मी तर सभापती होणारच नव्हतो पण मितेशला मात्र सभापती करु हा शब्द बाळासाहेब नाहाटा यांना राहूल जगताप यांनीच दिला होता.
मितेश सभापती झाला तर काही खरे नाही असे वाटू लागल्याने त्याला पाडण्याचे कारस्थान सुरु झाले. त्यामुळेच त्या तरुण मुलाचे राजकारण सुरु होण्यापुर्वीच संपविण्याचा कुटील डाव राहूल जगताप यांच्या जवळच्या सोनेरी टोळीने टाकला व त्यात ते यशस्वी झाले. हा सगळा घटनाक्रम झाला व त्यानंतर सभापती, उपसभापती पदाची निवडणूक लागली. मला सभापती व्हायचे नव्हते. मी त्यासाठी इच्छूकही नव्हतो मात्र काहींनी माझे नाव पुढे केले व पुर्वनियोजीत माझा कार्यक्रम करण्याचा डाव राहूल जगताप व त्यांच्या बगलबच्च्यांनी टाकला.
मला सगळ्यांनी विरोध केला हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न झाला. मी अण्णांचा मुलगा आहे. उतरलो की आर नाही तर पार अशीच लढाई करतो हे काष्टीकरांना चांगलेच माहिती आहे. मला सभापती व्हायचेच नव्हते त्यामुळे मी त्यात उतरलोच नाही. पण ज्यांनी मला पाडण्याचा प्रयत्न केला त्यांना उमेदवारी दिल्यावर मी त्यांना कशी मदत करु शकतो. आपणच सांगा ज्यांनी माझे राजकारण संपविण्याचा प्रयत्न केला हे पुराव्यानिशी माझ्या पुढे आल्यावरही मी त्यांना मदत करणे योग्य होते का ?
राहूल जगताप यांचे व माझे कुठलेही राजकीय संबंध नव्हते, मात्र केवळ राज्याचे नेते अजित पवार यांनी मला आदेश दिला व तो मी मान्य केला. पण जे त्यांच्या नेत्याला डोक्यावरुन टाकण्याची तयारी करतात ते मला व माझ्या कार्यकर्त्यांना भविष्यातही पाडापाडीचे राजकारण करतील हे न समजण्याएवढे आम्ही दुधखुळे नाहीत. या गद्दारीनंतर एक मोठा व महत्वाचा निर्णय घेत आहे. माझ्या विचारांच्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून आपण तालुक्याच्या राजकारणात स्वतंत्र राहणार आहोत. मित्रांनो तुम्ही सांगा यात माझे काय चुकले का…..
फक्त आपलाच,
साजन सदाशिव पाचपुते