बाजारभाव

सोयाबीन विक्रीची घाई न केल्यास शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळणार; कारण…

अहमदनगर- चालू वर्षी अतिवृष्टीने सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. सोयाबीन विक्रीची घाई न केल्यास बाजारभाव वाढतात हा अंदाज आल्याने गेल्या दोन वर्षापासुन शेतकऱ्यांना हमी भावापेक्षाही जास्त दर मिळत असल्याचे दिलासादायक चित्र आहे.

 

शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीमध्ये घाई न केल्याने पुरवठ्याअभावी सोयाबीनचे बाजार दररोज वाढतांना दिसत आहेत. येत्या काळातही आणखी भाव वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 

शेतकऱ्यांना रोखचोख पैसे देणारे सोयाबीन हे नगदी पिक आहे. चालु वर्षी परतीच्या पावसाने सोंगणीस आलेल्या सोयाबीन पिकांचे फार मोठे नुकसान झाले. सुरवातीस पिक चांगले येवुनही अतिवृष्टीने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. सन २०२२-२३ या वर्षासाठी शासनाने सोयाबीनला ४ हजार ३०० हमीभाव जाहीर केला आहे.

 

गेल्या दोन वर्षापासुन सोयाबीनच्या भावातील चढउतारांचा व मागणी पुरवठ्याचे गमक कळाल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी अपेक्षित भाव येईपर्यंत सोयाबीन विकायची नाही असे धोरण घेतल्याचे चित्र आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा अत्यंत कमी असल्याने बाजारभाव वाढत आहेत. सोयाबीन भावाने सध्या पावने सहा हजारांचा टप्पा गाठला असुन येत्या काळातही सोयाबीनचे बाजार भाव चांगल्या पद्धतीने वाढण्याचा अंदाज या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करीत आहेत.

 

वाढलेले डीझेलचे दर, मजुरी, बियाणे, खते यांच्यात वाढ झाल्यामुळे उत्पादन खर्चही प्रंचड वाढला आहे. त्यामुळे मिळेल त्या भावात सोयाबीन विकल्यास उत्पन्न व खर्च यांचा मेळ घालणे कठीन जाते. सोयाबीन साठविल्यास घट किंवा इतर नुकसान होत नाही. त्यामुळे योग्य भाव मिळेपर्यत सोयाबीन ठेवायचे असे धोरण शेतकरी वर्गातुन दिसत आहे. सोयाबीनच्या वाढत्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळणार असल्याने बळीराजाला दिलासा मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button