अहमदनगर

वीज बिल भरण्यासाठी फोन आल्यास तुमची होईल फसवणूक; नगरमध्ये महिलेला…

अहमदनगर- वीज बिल भरणा करण्यासाठी एखादा फोन आल्यास तुमची फसवणूक होऊ शकते, कारण अलिकडच्या काळात अशा फेक कॉलद्वारे अनेकांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. अशीच एक फसवणूक नगर शहरातील भिंगार उपनगरात झाल्याचे समोर आले आहे.

 

वीज बिल भरा अन्यथा कनेक्शन कट केले जाईल, असे खोटे सांगून एका महिलेच्या खात्यातून 49 हजार 999 रूपये वेळोवेळी काढून घेण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे संबंधीत महिलेच्या लक्षात येताच त्यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दोन मोबाईल नंबरधारक अनोळखी व्यक्तींविरूध्द भादंवि कलम 420, 379, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 43, 66 (ड) प्रमाणे गुन्हा केला आहे. रविवारी दुपारी 1:06 ते 1:48 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे.

 

भिंगार शहरातील जामखेड रोडवर राहणार्‍या 53 वर्षीय फिर्यादी महिलेला रविवारी दुपारी फोन आला. समोरील व्यक्ती फिर्यादीला म्हणाली,‘तुमचे इलेक्ट्रीसिटीचे बिल भरले नाही, तुमचे कनेक्शन कट केले जाईल, तुम्ही भरलेले मागिल महिन्याचे बिलही अपडेट झाले नाही, कृपयाकरून आपण इलेक्ट्रीसिटीला संपर्क साधा’, यानंतर त्या व्यक्तीने फिर्यादीच्या मोबाईल नंबरवर मेसेज पाठवून दोन अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले.

 

फिर्यादीने मोबाईलमध्ये अ‍ॅप डाऊनलोड करताच समोरील व्यक्तीने तोतयागिरी करून फिर्यादीच्या बँक खात्यातून वेळोवेळी 49 हजार 999 रूपये काढून घेत फसवणूक केली आहे. पोलिसांनी दोन मोबाईल नंबरवरील अनोळखी व्यक्तींविरूध्द गुन्हा दाखल केला असून अधिक तपास तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button