अहमदनगर

संतांच्या या भूमीत गोळीबारासारख्या घटना अपेक्षीत नाहीत – विठ्ठलराव लंघे पाटील

 मंत्री गडाख यांचे स्विय सहायक राजळे यांच्यावर गोळीबाराची घटना गेल्या आठवड्यात घडली. त्यानंतर थेट गडाख यांच्या कुटुंबावर हल्ल्याची तयारी असल्याचा उल्लेख असलेली ऑडिओ क्लिप समोर आली.

या प्रकारामुळे नेवासा तालुका हादरला आहे. नेवासा तालुक्याचे नाव संत ज्ञानेश्वर यांच्यामुळे जगाच्या कानाकोपर्यात पोहचलेले आहे. संतांच्या या भूमीत गोळीबारासारख्या घटना अपेक्षीत नाहीत. असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील यांनी केले.

नेवासा तालुक्याचे नेतृत्व आतापर्यंत अनेक दिग्गजांनी केलेले आहे. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्यासह कुटुंबाने त्या दिग्गजांची परंपरा कायम राखली. मात्र गडाख कुटुंबातील सदस्यांवर राजकीय आरोपांसोबत आता थेट जीवघेणा हल्ल्याचे प्लॅनिंग होणे धक्कादायक आहे. या प्रकारामुळे तालुक्याच्या राजकारणाविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.

लंघे पाटील यांनी या घटनांवर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, सध्या तालुक्यात घडणार्‍या घटना अतिशय चुकीच्या आहेत. त्यांचे समर्थन कोणीही करणार नाही. तालुक्याच्या राजकीय जडणघडणीत वकीलराव लंघे पाटील, मारुतराव घुले पाटील, संभाजीराव फाटके, यशवंतराव गडाख पाटील या नेत्यांचा मोलाचा वाटा आहे. आतापर्यंत तालुक्याचे वातावरण सुसंस्कृत होते.

मात्र सध्याच्या घटना कटू वातावरण निर्माण करणार्‍या आहेत. हा प्रकार संवेदनशील असून कोणाच्याही कुटुंबाबाबत असे घडू नये, अशी अपेक्षा आहे. तालुक्यात राजकीय गुंडगिरी सुरू राहिल्यास तालुक्यातील नेतृत्वाने काम कसे करावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button