वाढती गुन्हेगारी; शिर्डी, शिंगणापूर आणि नगरमधील रस्ते, चौकांत बसविणार सीसीटीव्ही

अहमदनगर- नगरसह शिर्डी व शनिशिंगणापूर शहराचा दिवसेंदिवस विस्तार वाढत आहे. रहदारी वाढत आहे. गुन्हेगारीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. मंगळसूत्र चोर्या, पैशांच्या बॅग पळवणे अशा घटनाही वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रमुख रस्ते व चौकांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे.
दरम्यान सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नगर शहरासह शिर्डी व शिंगणापूर या दोन तीर्थक्षेत्रांच्या शहरांत प्रमुख रस्ते व चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हा नियोजन मंडळाकडे पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली.
येत्या काळात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी पूर्ण होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. जिल्हा पोलीस प्रशासनाने या दृष्टीने पावले उचलली आहेत.
अधीक्षक ओला म्हणाले की, प्रमुख शहरांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसविणे आवश्यक आहे. जिल्हा नियोजन मंडळाच्या नाविन्यपूर्ण योजनेतून यासाठी निधी उपलब्ध होऊ शकतो. त्यादृष्टीने जिल्हा नियोजन मंडळाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्याला प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर तिनही शहरांमध्ये सर्वेक्षण करून ठिकाणे निश्चित केली जातील. त्यानंतर निधीसाठी प्रस्ताव दिला जाणार आहे. नाविन्यपूर्ण योजनेतून हे काम मार्गी लावण्याचे प्रयत्न आहेत.
नगर तालुका पोलीस ठाणे शहरापासून लांब असल्याने नागरिकांना अडचणी येतात. त्यामुळे इतर शासकीय कार्यालयांच्या जवळ हे पोलीस ठाणे असावे, अशा सूचना खासदार डॉ. सुजय विखे यांनी केल्या होत्या. तसेच भिंगार पोलीस ठाण्यासाठी नवीन इमारतीचा प्रस्तावही विचाराधीन असल्याचे अधीक्षक ओला यांनी सांगितले.
जिल्हा पोलीस प्रशासनाकडे सुमारे पाच कोटींचा निधी दोन वर्षांपूर्वी उपलब्ध झाला होता. तो खर्च झाला नाही. त्यातून पोलीस ठाण्याच्या इमारतीची दुरूस्ती, नवीन इमारत, वाहन खरेदी प्रस्तावित होती. या निधीच्या वापरासाठी पुन्हा मंजुरी घ्यावी लागणार आहे. त्यातून भिंगार पोलीस ठाण्याच्या नवीन इमारत बांधणी करता येईल का, याबाबतही प्रयत्न सुरू असल्याचे अधीक्षक ओला यांनी सांगितले.