अहमदनगर

चक्क एलसीबीचा संगमनेरच्या कत्तलखान्यावर छापा

अहमदनगर- गेल्या अनेक दिवसांपासून संगमनेर येथे सुरू असलेल्या कत्तलखान्यावर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने कारवाई केली नव्हती. दरम्यान राकेश ओला यांची जिल्हा पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत.

 

यामुळे एलसीबीने संगमनेर शहरातील खाटीक गल्ली परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर कत्तलखान्यावर छापा टाकून या कत्तलखान्यावर कारवाई केली. या कत्तलखान्यामधून 1 लाख 80 हजार रुपयांचे 900 किलो गोमांस जप्त करण्यात आले असून याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

राज्यात गोहत्या बंदी कायदा अस्तित्वात असतानाही संगमनेर शहरात मात्र बेकायदेशीर कत्तलखाने सुरूच आहेत. हिंदुत्ववादी संघटनांनी वेळोवेळी आंदोलने करूनही शहरातील कत्तलखाने बंद होण्याचे नाव घेत नाहीत.

 

अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस संगमनेर शहरात अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी फिरत असताना एलसीबीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे यांना शहरातील खाटीक गल्ली येथे कत्तलखाना सुरू असल्याची माहिती मिळाली. पथकातील पोलिसांनी खाटीक गल्ली येथे जाऊन खात्री केली असता मोकळ्या जागेत काही इसम जनावरांची कत्तल करताना दिसले.

 

पोलिसांनी छापा टाकल्याची चाहुल लागल्याने काही जणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यातील सगीर बुडाण कुरेशी याला पकडण्यात पोलिसांना यश आले. इतरांना घटनास्थळी ताब्यात घेण्यात आले. या कत्तलखान्याची तपासणी केली असता कत्तलखान्यामध्ये 1 लाख 80 हजार रुपये किमतीचे 900 किलो गोमांस आढळले.

 

या कत्तलखान्यामधून पोलिसांनी 2 सुरे, लोखंडी कुर्‍हाड जप्त केली.याबाबत पोलीस नाईक सचिन दत्तात्रय आडबल यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी सगीर बुढाण कुरेशी, (वय 40. रा. खाटीक गल्ली, संगमनेर ता. संगमनेर), मुशफिक मजरुल शेख (वय 50, रा. भारतनगर), मतीन बशीर कुरेशी (वय 35, रा. मोगलपुरा), फयीम खालीद कुरेशी (वय 35, रा. मोगलपुरा), इर्शाद कादर कुरेशी (रा. खाटीक गल्ली, संगमनेर), मुजाहीद अब्दुल करीम कुरेशी (रा. खाटीक गल्ली) यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 269, 34 महाराष्ट्र पशुसंरक्षण (सुधारणा) अधिनियम सन 1995 चे कलम 5 (क), 9 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button