महागाई कमी झाली ! सर्वसामान्यांना मोठा दिलासा । ॥ धान्य, दूध, फळे झाले स्वस्त!

Ahmednagar news: एप्रिल महिन्यात सर्वसामान्यांना महागाईच्या आघाडीवर मोठा दिलासा मिळाला आहे. एप्रिल महिन्यात महागाईचा दर कमी झाला आहे. स्वस्त खाद्यपदार्थांमुळे एप्रिलमध्ये किरकोळ चलनवाढीचा दर १८ महिन्यांच्या नीचांकी ४.७ टक्क्यांवर आला.
शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या सरकारी आकडेवारीत ही माहिती देण्यात आली. दरम्यान, हा सलग दुसरा महिना आहे, जेव्हा ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईं (सीपीआय) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या समाधानकारक मर्यादेत आहे. महागाई दर दोन टक्क्यांच्या फरकासह ४ टक्के ठेवण्याची जबाबदारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे (आरबीआय) आहे.
आकडेवारीनुसार, सीपीआय आधारित किरकोळ चलनवाढ या वर्षी मार्चमध्ये ५.६६ टक्के होती आणि वर्षभरापूर्वी एप्रिलमध्ये ७.७९ टक्के होती. एप्रिल महिन्यातील किरकोळ चलनवाढीचा दर ऑक्टोबर २०२१ नंतर नीचांकी पातळीवर आहे. त्या वेळी तो ४.४८ टक्के होता.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानुसार, एप्रिलमध्ये खाद्यपदार्थांच्या महागाईचा दर ३.८४ टक्के होता, जो मार्चमध्ये ४.७९ टक्के होता. एक वर्षापूर्वी एप्रिल महिन्यात हे प्रमाण ८.३१ टक्के होते
आरबीआय गव्हर्नर समाधानी किरकोळ महागाई एप्रिलमध्ये ४.७ टक्क्यांपर्यंत खाली येत असल्याचे ‘चित्र’ अत्यंत समाधानकारक’ आहे. आर्थिक धोरण योग्य मार्गावर असल्याचे हे चित्र दर्शवते, असे सांगत आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास पुढे म्हणाले की, २०२३ – २४ या आर्थिक वर्षात जीडीपी वाढीचा दर ६.५ टक्के राहील, असा पूर्ण विश्वास आहे. खासगी क्षेत्र आणि सरकार या दोघांनीही संशोधन आणि विकासावर खर्च वाढवण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले
धान्य झाले स्वस्त तृणधान्ये, दूध आणि फळे इत्यादीच्या किमती वाढल्यामुळे किरकोळ महागाई डिसेंबर २०२२ मध्ये ५.७ टक्क्यांवरून या वर्षी फेब्रुवारीमध्ये ६.४ टक्क्यांवर पोहोचली. रिझर्व्ह बँकेने २०२३ – २४ या आर्थिक वर्षात किरकोळ महागाई ५.२ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
उत्पादने आणि महागाई दर एप्रिलमध्ये अन्नधान्य आणि संबंधित उत्पादनांचा महागाई दर १३.६७ टक्के होता, जो मार्चमध्ये १५.२७ टक्के होता. याशिवाय, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा महागाई दर ८.८५ टक्के आहे, जो मार्चमध्ये ९.३१ टक्के होता. मसाल्यांच्या महागाईचा दर १७.४३ टक्के आहे. पालेभाज्या भाज्यांचा महागाई दर ६.५० टक्के, डाळींचा भाव ५.२८ टक्के, मांस आणि माशांचा महागाई दर १.२३ टक्के, तेल आणि फॅट्सचा महागाई दर १२.३३ टक्के राहिला आहे.