अहमदनगर

महागाईत दिलासा: नगर जिल्ह्यातील 30 लाख लाभार्थ्यांना मिळणार मोफत धान्य

अहमदनगर- केंद्र सरकारच्या निर्णयामुळे गोरगरीब जनतेला सध्याच्या महागाईत आर्थिक दिलासा मिळणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून पात्र रेशन कार्डधारकांना आता वर्षभर मोफत अन्नधान्य उपलब्ध होणार आहे. या निर्णयाचा लाभ नगर जिल्ह्यातील 30 लाख जनतेला होणार आहे. यात जानेवारीत अंदाजे 47 हजार मॅट्रिक टन धान्याचे वाटप केले जाणार आहे.

 

गोरगरीब जनतेला स्वस्त धान्य स्वस्त दरात धान्य उपलब्ध व्हावे, यासाठी सरकारतर्फे रेशनचे धान्य वितरित करण्यात येते. यात गहू, तांदुळ, साखरचे वाटप केले जात होते. केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून मानसी प्रतिकिलो तीन रुपये दराने तांदूळ, दोन रुपये दराने गहू, व एक रुपया दराने भरड धान्य उपलब्ध करून दिले जात आहे.

 

त्यानुसार राज्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा स्वस्त धान्य वाटप केले जात आहे. जिल्ह्यातील 29 लाख 52 हजार 852 गोरगरीब जनतेला दरमहा धान्य वितरित केले जात आहे.

 

करोनाच्या कालावधीत जनतेला केंद्र सरकारतर्फे दरमहा मोफत धान्य दिले जात होते. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दरमहा दोनदा धान्य उपलब्ध होत होते. आता केंद्र सरकारने 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत रेशन कार्डधारकांना दरमहा मोफत धान्य वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

त्यामुळे जनतेला दरमहा मोफत धान्य उपलब्ध होणार आहे. या महागाईच्या काळात जनतेला दिलासा मिळणार आहे. मोफत धान्य वितरित करण्याबाबत जिल्हा पुरवठा विभागाला आदेश प्राप्त झाले आहेत त्यानुसार या विभागामार्फत नियोजन सुरू आहे.

 

 

6 लाख 93 हजार 620 कार्ड धारक

 

जिल्ह्यात अंतोदयचे कार्डधारक 87 हजार 630 तर लाभार्थी 4 लाख 7 हजार 419 इतके आहेत. तर प्राधान्य कुटुंबातील कार्डधारक 6 लाख 5 हजार 990 तर 25 लाख 45 हजार 473 लाभार्थी असे एकूण 6 लाख 93 हजार 620 अंतोदय व प्राधान्य कुटुंबातील कार्ड धारक असून जिल्ह्यात एकूण लाभार्थी 29 लाख 52 हजार 892 लाभर्थी आहेत.

 

जिल्ह्यात 1 हजार 884 स्वस्त धान्य दुकाने आहेत. या दुकानामार्फत दरमहिन्याला आंदाजे 16 हजार मॅट्रिक टन धान्य करीत केले जाते. मात्र डिसेंबर महिन्यांचे नियतन व मोफत धान्य असे मिळून जानेवारी महिन्यात अंदाजे 47 हजार मॅट्रिक टन धान्य वितरित केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button