बँकेकडून राहाता तालुक्यातील शेतकर्यांवर होतोय अन्याय…व्याजाचे परतावे देण्याची होतेय मागणी

नियमीत पीक कर्ज भरणार्या शेतकर्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने केंद्र व राज्य सरकार तीन लाखांपर्यंतच्या पीक कर्जावरील सहा टक्के व्याज पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत शेतकर्यांना परत देते.
मात्र गेल्या दोन वर्षांपासून बँकेकडून हे व्याज परतावे देण्यात आलेले नाहीत. असा प्रकार राहाता तालुक्यात घडला आहे.
जिल्हा बँकेने राहाता तालुका वगळता इतर तालुक्यातील शेतकर्यांना व्याज परताव्याच्या रकमा दिल्या आहेत. मात्र राहाता तालुक्यातील नियमीत पीक कर्ज भरणार्या हजारो शेतकर्यांना या व्याज परताव्यांपासून वंचित राहावे लागत आहे.
जिल्हा बँकेने यापूर्वी सन 2014-15 मध्ये नाबार्ड अंतर्गत 35 टक्के अनुदान असलेल्या डेअरी डेव्हलपमेंट योजने अंतर्गत राहाता तालुक्यातील शेतकर्यांना 2016-17 मध्ये अनुदानापासून वंचित ठेवले आहे.
पीक कर्जाच्या व्याज परताव्या बाबतही अशीच परिस्थिती सध्या निर्माण झाली असून राहाता तालुका वगळता इतर तालुक्यात पंजाबराव देशमुख व्याज परतावा योजनेअंतर्गत व्याज परताव्याच्या रकमा शेतकर्यांच्या खात्यावर जमा होत आहेत.
बँकेने राहाता तालुक्यातील शेतकर्यांचे गेल्या दोन वर्षाचे व्याजांचे परतावे द्यावेत, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.