जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले; ‘हे’ 12 गुन्हेगार झाले हद्दपार

संघटितपणे टोळी तयार करून मारहाण करत दुखापत करणे, गंभीर दुखापत करणे, रक्कम बळजबरीने काढून घेणे, जिवे ठार मारण्याची धमकी देणे, महिलांसोबत गैरवर्तन करणे, धार्मिक भावना दुखावणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे,
जातीवाचक शिवीगाळ करणे, अनाधिकाराने मालमत्तेचे नुकसान करणे असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या 12 सराईत आरोपींविरूध्द जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी हद्दपारीची कारवाई करून गुन्हेगारांना दणका दिला आहे.
स्थानिक पोलिसांनी अधीक्षक पाटील यांच्याकडे पाठविलेल्या प्रस्तावाला त्यांनी मंजूरी देत याबाबत आदेश काढले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारा श्रीपाद छिंदम याच्यासह त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम यांचाही यामध्ये समावेश आहे. सराईत गुन्हेगारांना हद्दपार केल्यामुळे त्यांच्या गुन्हेगारी कृत्याला आळा बसणार आहे.
टोळीप्रमुख श्रीपाद शंकर छिंदम (वय 37), श्रीकांत शंकर छिंदम (वय 45 दोघे रा. मोहनबाग, दिल्लीगेट, अहमदनगर) यांना अहमदनगर जिल्ह्यातून एक वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. त्यांच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात सात गुन्हे दाखल आहेत.
संगमनेर तालुक्यात दहशत निर्माण करणार्या घुगे टोळीला संगमनेर, राहुरी आणि राहाता तालुक्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. टोळीप्रमुख संदीप भाऊसाहेब घुगे (वय 39), मारूती सगाजी नगरे (वय 62),
विजय बच्चू डोंगरे (वय 44), अमोल सोमनाथ डोंगरे (वय 28), दीपक सोमनाथ डोंगरे (वय 27) आणि शशिकांत उर्फ मंगेश शिवाजी नागरे (वय 22, सर्व रा. मालुंजे, ता. संगमनेर) यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. टोळीविरूद्ध संगमनेर तालुुका पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल आहेत.
भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत 10 गंभीर गुन्हे करून दहशत निर्माण करणार्या जायभाय टोळीला जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. टोळीप्रमुख अविनाश विश्वास जायभाय (वय 24 रा. केडगाव), ऋषिकेश अशोक बडे (वय 23) आणि नितीन उर्फ किरण किसन लाडू (वय 22 दोघे रा. सारसनगर, अहमदनगर) अशी हद्दपार केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण येथील अक्षय सुभाष सोनवणे (वय 26) याला दोन वर्षासाठी अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. त्याच्याविरूद्ध बेलवंडी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत.