Ahmednagar News : अहमदनगरमध्ये आयपीएलची सट्टेबाजी जोरात; कारवाईकडे एलसीबीसह शहर पोलिसांचे दुर्लक्ष

आयपीएलच्या 15 व्या हंगामाच्या खेळाला सुरूवात झाली आहे. दरवर्षी आयपीएल दरम्यान अनेक लोक मोठ्या प्रमाणात सट्टेबाजी करतात.p
यातून लाखो रूपयांची उलाढाल होते. आयपीएल बेटिंग रॅकेट चालवणार्या टोळ्या या काळात सक्रिय असतात. आयपीएल बुकीकडून लॅपटॉप, मोबाईल फोन, टेलिव्हिजन संच आणि इतर सट्टेबाजीच्या वस्तूंचा यासाठी वापर केला जातो.
एजंट लोकांकडून सट्टा घेतात आणि ते फोनवर आधारित क्रिकेट सट्टेबाजी अॅप्लिकेशनद्वारे बुकीकडे जातात. सट्टेबाजांना त्यांच्या फोनवर अॅप इन्स्टॉल करण्यास सांगितले जाते.
अंतिम निकाल आणि इतर बाबींवर सामन्यादरम्यान हे बेट घेतले जात असतात, दुसर्या दिवशी सकाळी ते निकाली काढला जातो. सध्या सुरू असलेल्या या आयपीएलच्या 15 व्या हंगामावर अहमदनगर शहरात मोठ्या प्रमाणात सट्टेबाजी सुरू आहे.
क्रिकेटचे वेड असलेली व कमी वेळात जास्त पैसा मिळण्याच्या लोभापायी या सट्टेबाजीत तरूण पिढी बरबाद होत आहे. मध्यंतरी कोतवाली पोलिसांनी सट्टेबाजी चालविणार्या बुकीवर कारवाई करत त्यांना अटक केली होती.
मात्र छुप्या पध्दतीने सुरू असलेल्या या सट्टेबाजीवर पोलिसांकडून ठोस कारवाई होताना दिसत नाही. कारवाईकडे पोलिसांचा कानाडोळा झाल्याचे दिसून येत आहे. सट्टाकिंग मेहनत न करता भरपूर पैसे मिळवण्याचे लालूच दाखवून विद्यार्थ्यांना सट्ट्याच्या जाळ्यात ओढत आहेत.
ह्यावर्षी तर अहमदनगर शहरात सट्टा खेळणार्यांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. त्यांना ह्या खेळाची विचित्र आणि वैशिष्ट्यपूर्ण भाषा शिकवून सट्टा खेळण्यासाठी तयार केले जात आहे.
ह्या सट्ट्याच्या बाजारात सट्टा लावणारी व्यक्ती एजंट किंवा ज्याला पंटर म्हटले जाते, त्याच्या मार्फत बुकीशी संपर्क साधतो. मोबाईल ऍप्लिकेशन्स आहेत ज्यावरून उघड उघड सट्टा खेळता येतो.
सट्टा खेळण्यासाठी त्या व्यक्तीला सुरुवातीला एजंटला काही रक्कम ऍडव्हान्स म्हणून द्यावी लागते. मग त्या व्यक्तीचे अकाउंट उघडले जाते. ह्या अकाउंटला एक लिमिट असते.
दरम्यान अहमदनगर शहरात आठ ते दहा बुकी असून त्यांच्याकडून सट्टेबाजी जोरात सुरू आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात माहीर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलिसांना मात्र सट्टेबाज बुकी सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
मध्यंतरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अनेक सराईत गुन्हेगारांना अटक केली. त्यांच्यावर कारवाई करण्यात हातखंडा असलेल्या एलसीबीला आयपीएलचे बुकी मात्र सापडत नाही.
दुसरीकडे मात्र कोतवाली पोलिसांनी दोन ते तीन वेळा आयपीएल बुकीवर कारवाई केली. एलसीबीकडून जाणीवपूर्वक कारवाईकडे कानाडोळा केला जात असल्याची चर्चा आहे.