ताज्या बातम्या

शिवभोजन चांगले मिळते का ? मुख्यमंत्री शिंदे यांची लाभार्थ्यांना विचारणा

आनंदाचा शिधा आणि शिवभोजन या दोन्ही योजनांच्या लाभार्थ्यांशी थेट व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुरुवारी संवाद साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला.

शिवभोजन योजनेत जेवण चांगले मिळते का ? केंद्र चालक किती पैसे घेतात ? आनंदाचा शिधामध्ये मिळणाऱ्या रवा, साखर, पामतेल, चणाडाळ या वस्तू चांगल्या दर्जाच्या आहेत का ? एसटीच्या प्रवास शुल्कातील ५० टक्के सवलतीचा लाभ घेतलाय का ? अशी थेट विचारणा मुख्यमंत्र्यांनी केली. ‘राज्यातील सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे.

राज्यातील प्रत्येक घटकांच्या हिताचे निर्णय सरकार घेत आहे. जनतेच्या भल्यासाठीच योजना सुरू असून राज्याच्या सर्वांगीण विकासावर आमचा फोकस आहे, असा निर्वाळा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिला. गुरुवार दि.१३ रोजी मुंबई येथील मुख्यमंत्री कार्यालयातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवभोजन आणि आनंदाचा शिधा या दोन्ही महत्त्वाच्या योजनांचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला.

राज्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी आणि लाभार्थी या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये सहभागी झाले होते. मुंबई मंत्रालयात मुख्यमंत्री शिंदे यांच्या समवेत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण, अन्नधान्य वितरण विभागाचे सचिव विजय वाघमारे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

तर अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहातून या व्हिसीमध्ये निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी किशोर कदम, नगर शहर अन्नधान्य वितरण अधिकारी अर्चना पागिरे-भाकड, शिवभोजन केंद्र चालक साईनाथ घोरपडे, श्रीमती धायतडक, संजय डोळसे तसेच लाभार्थी सुनंदा अनंत कुलकर्णी, भागवत ठोकळ,

पांडुरंग म्हस्के, रियाज शेख आदींसह आनंदाचा शिधा ब शिवभजन योजनेचे निमंत्रित लाभार्थी उपस्थित होते. या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचे प्रास्ताविक राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. तर लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री शिंदे यांनी संवाद साधला. या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये मुख्यमंत्र्यांनी अकोला,

हिंगोली, पालघर, जळगाव, ठाणे, बुलढाणा, गोंदिया, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, वाशिम गडचिरोली, धाराशिव, सातारा, सोलापूर, वर्धा या जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी संवाद साधला.

सरकार क्वालिटीचे

या संवादादरम्यान शिवभोजन आणि आनंदाचा शिधामधील वस्तूंची कॉलिटी चांगल्या आहेत का ? अशी विचारणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. त्यावर लाभाथ्यांनी आनंदाच्या शिधामध्ये चांगल्या क्वालिटीच्या वस्तू मिळाल्या आहेत, असे सांगितल्यावर ‘हे सरकार कालिटीचे आहे,’ असे सांगितले.

यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिला लाभार्थ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी ‘एसटी प्रवासाच्या ५० टक्के सवलतीचा लाभ किती जणींनी घेतला ? असे म्हटले. त्यावर हिंगोलीतील एका महिलेने ‘होय साहेब, एसटीच्या सबलतीचा लाभ घेतला. औंढा नागनाथाला जाऊन आले,’ असे सांगितले. लाभार्थ्यांच्या प्रतिक्रिया ऐकून मुख्यमंत्र्यांनी ‘सर्वजण समाधानी रहा,’ अशी प्रतिक्रिया दिली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button