अहमदनगर

राज्याचे लक्ष लागलेला जवखेडे खालसा तिहेरी हत्याकांडाचा आज निकाल

राज्यात गाजलेले नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा तिहेरी हत्याकांडाचा आज गुरुवारी (ता. १९) निकाल लागत आहे. या निकालाकडे पाथर्डीसह राज्याचे लक्ष लागले.

ता. २० ऑक्टोबर २०१४ ला जवखेडे हत्याकांड होऊन या घटनेत संजय जाधव, त्यांची पत्नी जयश्री व मुलगा सुनील जाधव यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे विहीर व बोअरवेलमध्ये टाकण्यात आले होते.

दरम्यान या हत्याकांडाने नगर जिल्ह्यासह राज्यात एकच खळबळ उडाली होती. या हत्याकांड प्रकरणी अनेक राजकीय आंदोलने देखील झाली.

त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणातील आरोपींना अटक केली. दरम्यान या बहुचर्चित खटल्याचा आज निकाल जाहीर होणार आहे. प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश सुधाकर यलागड्डा यांच्या कोर्टात निकाल होणार आहे.

संजय जाधव, त्यांची पत्नी जयश्री व मुलगा सुनील जाधव या तिघांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी जवखेडे खालसातील अनेकांना ताब्यात घेत चौकशी केली.

मृत हे दलित समाजाचे असल्याने गावात जातीय तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणाचा तपास लवकर लागत नसल्याने देशभर त्याचे पडसाद उमटले होते तर अमेरिकेतही या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला.

नार्को चाचणीनंतर पोलिसांनी घटनेच्या ४४ व्या दिवशी या घटनेतील आरोपी मृत संजय जाधवचा पुतण्या प्रशांत, अशोक जाधव तर त्याचा भाऊ दिलीप जाधव यांना बेड्या ठोकल्या होत्या. आज या घटनेचा निकाल लागत असल्याने सर्वांचे लक्ष लागले आहे.

असे घडले होते क्रूर हत्याकांड २० ऑक्‍टोंबर २०१४ रोजी रात्री नऊ वाजता मारेकरी संजयच्या वस्तीवर गेले होते. त्यांनी संजय आणि जयश्री व सुनील यांना लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करून हातांनी गळे दाबून त्यांनाही ठार केले.

सुनीलचे मुंडके करवतीने कापले. याच पद्धतीने हात-पाय कापून धडा वेगळे केले. संजय आणि जयश्री यांच्या मृतदेहाचे दोन तुकडे केले. मयतांच्या घरासमोरील रक्‍ताने भरलेली चटई, ताडपत्री, तिघांच्या चप्पला, बॅटरी या जवळच असलेल्या दाविद जाधव यांच्या विहिरीत टाकून पुरावा नष्ट केला. हत्याकांडानंतर रक्‍त सांडले, त्या जागेवर माती आणून टाकली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button