अहमदनगर

जवखेडे खालसा तिहेरी हत्याकांड; सरकारी पक्षाचा लेखी युक्तीवाद

येथील प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्यासमोर जवखेडे हत्याकांड खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे. या खटल्यात 55 साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या आहेत.

दरम्यान आरोपींच्या वकिलांनी केलेल्या बचावाच्या युक्तीवादाला विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव पाटील यांनी 71 पानांचे लेखी युक्तीवाद करून उत्तर दिले आहे. जिल्हा न्यायालयाच्या अधिकृत मेलवर हा युक्तीवाद पाठविला आहे. आरोपींच्या वकिलांनी 12 दिवस बचावाचा युक्तीवाद केला होता.

गुन्ह्याचा तपास करणारे अधिकारी, साक्षीदार, पंच, वैद्यकीय अधिकारी, मोबाईल कंपन्यांचे अधिकारी आदींच्या साक्षी झाल्या आहेत. या अनुषंगाने आरोपींच्या वतीने विधिज्ञ सुनील मगरे, नितीन मोने, छगन गवई, सिद्धार्थ उबाळे, अरूण चांदणे यांनी 12 दिवस बचावाचा युक्तीवाद केला.

हत्याकांड संशयितांचे जाब पोलिसांनी दोषारोपपत्रात दाखल केलेले नाहीत. हत्याकांड झाले त्यावेळेस गावातील 164 मोबाईल फोन हे संशयित होते. मोबाईल कंपनीकडून डाटा उपलब्ध असताना तपासात घेतला नाही.

हत्याकांड झालेले घटनास्थळ सील केले नाही. त्यामुळे महत्वाचे पुरावे नष्ट झाले. यावेळेस काढलेले महत्वाचे फोटो ही गायब केले आहेत, अशा सुमारे 25 बाबींकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. या गुन्ह्याचा फेरतपास करावा, असे म्हणणे सादर केले.

विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव-पाटील यांनी या बचावाच्या युक्तीवादाला 71 पानी लेखी युक्तीवादाने प्रतिउत्तर दिले आहे. आरोपींच्या बचावाच्या युक्तीवादाचे खंडन केले आहे. परिस्थितीजन्य पुरावे, गुन्ह्यातील साखळीच्या आधारे आरोपींपर्यंत पोहचत आहे, हे या युक्तीवादात नमूद केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button