महिलांनो सावधान! घराबाहेर पडताना दागिने सांभाळ; नगरी रस्त्यावर चोरट्यांचा धुमाकूळ

अहमदनगर- सोनसाखळी चोरीच्या घटना रोखण्यात पोलिसांना अपयश आले आहे. पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथकालाही हे चोरटे सापडत नसल्याचे दिसून येत आहे. नगर शहरातील सोनसाखळी चोरीच्या घटना थांबायला तयार नाही. एकाच दिवशी चार ठिकाणी महिलांच्या गळ्यातील दागिने चोरून नेण्याच्या घटना घडल्या आहेत. रविवारी सकाळी व सायंकाळी सावेडी उपनगरात तीन तर नालेगाव परिसरात एक घटना घडली. यासंदर्भात तोफखाना आणि कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
रविवारी सकाळी शोभा सुधाकर कल्हापुरे (वय 50 रा. शिवनगर, जुना पिंपळगाव रोड, सावेडी) व त्यांचा मुलगा दुचाकीवरून एकविरा चौकाकडून तपोवन रोडकडे जात असताना साहीब बेकरीसमोर पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चोरट्याने शोभा यांच्या गळ्यातील दोन तोळ्याचे मिनी गंठण ओरबडून धूम ठोकली. यासंदर्भात कल्हापुरे यांनी रविवारी दुपारी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी सायंकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास पुष्पावती पंडीतराव ठमके (वय 59 रा. सोनानगर, सावेडी) या त्यांच्या नातवाला घेऊन सोनानगर पार्क पासून पाटील चौकाकडे जात असताना साबळे यांच्या घराजवळ सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याचे मिनी गंठण ओरबडले. पुष्पावती यांचा नातू सायकलसह रस्त्यावर पडला. पुष्पावती त्याला उचलण्यासाठी खाली वाकल्या असता चोरट्याने त्यांच्या गळ्यातील गंठण ओरबडून पायी पळत सुटला. पुष्पावती यांनी आरडाओरडा केला, परंतू चोरटा पसार झाला. यानंतर त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
याच चोरट्यांनी पुढे सायंकाळी 7.25 वाजेच्या सुमारास लक्ष्मी उद्यानजवळ वनिता सुभाष जोशी यांच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चैन ओरबडली. दरम्यान वनिता यांनी चोरट्यांचा प्रतिकार केला असता चोरट्याने सोन्याच्या चैनीचा आर्धा भाग तोडून पळ काढला.
रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास नालेगाव परिसरातील कुंभारगल्लीमध्ये असलेल्या ईशान अपार्टमेंटमध्ये घुसून महिलेच्या गळ्यातील एक तोळ्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केले. यासंदर्भात संपदा संजय साठे (वय 42 रा. कुंभारगल्ली, नालेगाव) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. साठे व त्यांच्या अपार्टमेंटमध्ये राहणार्या त्यांच्या मैत्रीण सुनीता बाळासाहेब खिलारी या बाजारात गेल्या होत्या. त्या रात्री नऊ वाजता घरी आल्या. त्यांनी त्यांची दुचाकी अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये पार्क केली व पायर्या चढून फ्लॅटमध्ये जात असताना एक अनोळखी व्यक्ती तेथे आला.
त्यांने, येथे त्रिवेदी राहतात काय? अशी विचारणा केली. सुनीता यांनी त्याला येथे त्रिवेदी राहत नसल्याचे सांगितले. तेवढ्यात त्याने सुनीता यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी प्रतिकार केला असता त्यांना खाली ढकलून दिले. चोरट्याने संपदा यांच्या गळ्यातील एक तोळ्याचे मंगळसूत्र ओरबडून खाली धूम ठोकली. तो चोरटा दुचाकीवर त्याच्या साथीदारासह पळून गेला.