अहमदनगर

कामात हलगर्जीपणा, वर्गात मुलींची छेडछाड भोवली; सहा प्राथमिक शिक्षक निलंबित

अहमदनगर- पर्यवेक्षण कामात हलगर्जीपणा, वर्गात मुलींची छेडछाड, स्वत:च्या शाळेत डमी बेरोजगार शिक्षकांची नेमणूक करत अध्यापन करून घेणे जिल्हा परिषदेच्या सहा शिक्षकांना चांगलेच महागात पडले आहेत. मागील आठवड्यात या सहा शिक्षकांवर निलंबन प्रस्तावित करण्यात आली होते. मंगळवारी प्रत्यक्षात संबंधीत शिक्षकांवर मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी निलंबनाची कारवाई केली.

 

निलंबितांमध्ये दोन केंद्र प्रमुखांसह तीन उपाध्यापकांचा समावेश आहे. पारनेर तालुक्यातील हिवरेकोरडा येथील मांजरधाव प्राथमिक शाळेत शिक्षकाने स्वत: अध्यापन करण्याऐवजी परस्पर खासगी बेरोजगार डीएड शिक्षकांची नेमणूक स्वत: त्यापोटी पगार घेतल्याचे समोर आले होते. गेली अनेक वर्षापासून हा प्रकार सुरू असल्याचे शिक्षण विभागाच्या तपासणीत समोर आले होते.

 

बाजीराव शंकर पानमंद असे शिक्षकांचे नाव असून त्याला निलंबित करण्यात आले असून त्याचे मुख्यालय आता अकोले करण्यात आले आहे. तर पारनेर पंचायत समितीमधील केंद्रप्रमुख अविनाश गुलाब गांगर्डे यांच्यावर ठपका ठेवून त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच त्याला मुख्यालय अकोले देण्यात आले आहे.

 

संगमनेर तालुक्यातील कारेगाव येथील झेडपीच्या शाळेत रमेश शिवाजी आहेर नावाच्या शिक्षकांने बेरोजगार शिक्षकांची परस्पर नेमणूक करत त्यांच्याकडून अध्यापन करून घेतले होते. याबाबत थेट मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे माहिती दिल्यानंतर त्यांनी त्याठिकाणी गुप्तपणे तपासणी केली असता शिक्षक आहेर याचे कृत्य समोर आले होते. आहेर याला निलंबित करण्यात आले असून त्याला मुख्यालय जामखेड देण्यात आले आहे.

 

राहुरी तालुक्यातील निंभेरेच्या शाळेत मुलींची छेडछाड प्रकरणी शिक्षक मदन दिवे याच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. दिवे याला निलंबित करण्यात आले असून त्याला मुख्यालय जामखेड देण्यात आले आहे. पारनेर तालुक्यातील पाडळी दर्‍या येथील शिक्षक पोपट फाफाळे यांने देखील वर्गातील मुलींची छेड काढली होती. फाफाळे याला निलंबित करण्यात आले असून त्याला मुख्यालय अकोले देण्यात आले आहे.

 

संगमनेर तालुक्यातील जवळे बाळेश्वर येथील केंद्र प्रमुख प्रभाकर रोकडे यांनी पर्यवेक्षिय कामात हालगर्जीपणा केला होता. रोकडे यांना निलंबित करण्यात आले असून त्याला मुख्यालय जामखेड देण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button