विधान परिषद निवडणूक : कोण किती पाण्यात ? वाचा जिल्ह्यातील राजकीय समीकरण…

दिवाळी संपताच ऐन थंडीत विधान परिषदेचे राजकारण तापणार आहे. विधान परिषद सदस्य होण्याची कामना अनेकांनी मनी धरली आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत मोठी उलथापालथ झाली.
भाजपकडून एकटे कर्डिले इच्छुक नाहीत. तर उत्तरेतील आखणी दोन नेत्यांनी पडद्याआड तयारी सुरू केल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. भाजपने अद्याप तरी कोणत्याही नेत्याचे नाव विधान परिषदेसाठी पुढे केलेले नाही.
भाजपकडून कर्डिले यांना उमेदवारी न मिळाल्यास ऐनवेळी ते राष्ट्रवादीचा पर्याय निवडतील का? या स्थितीत राष्ट्रवादीतील इच्छुकांचे काय होणार? कोणाकडे कोणता राजकीय पर्याय उपलब्ध असेल? याविषयी दिवाळी फराळासोबत खमंग चर्चा सुरू आहे.
गेल्या विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे अरुण जगताप विजयी झाले होते. यंदा त्यांचे व्याही माजी आ. शिवाजी कर्डिले भाजपकडून इच्छुक आहेत. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेची महाविकास आघाडी सत्तेत आहे.
या आघाडीकडून कोण लढणार, याची उत्सुकता कायम आहे. राष्ट्रवादीचे माजी आ.चंद्रशेखर घुले यांच्या नावाची चर्चा दबक्या आवाजात आहे. मात्र पक्ष विद्यमान आ.जगताप यांच्याऐवजी त्यांना संधी देणार का, याची उत्सुकता आहे.
विधान परिषदेसाठीचे पक्षीय बलाबलाची चाचपणी केली जात आहे. सध्या मतदानासाठी 396 मतदार पात्र आहेत. त्यात राष्ट्रवादीचे 91, काँग्रेसचे 78, शिवसेनेचे 60, भाजपचे 119 (विखे गट 30),
रासप 1, मनसे 1, बसपा 4, सपा 1, अपक्ष 7 आणि अन्य 4 मतदारांचा समावेश आहे. हे कागदावरील पक्षीय बलाबल असले तर मतदानाआधी अनेक घडामोडी होण्याची शक्यता आहे.