शिकारीच्या शोधात बिबट्या शिरला पिंजऱ्यात ! शेपटी तुटली आणि…
मात्र, पिंजऱ्यात हा बिबट्या मावेना. त्याची शेपटी पिंजऱ्याच्या बाहेरच राहिली. तेवढ्यात पिंजऱ्याचा खटका पडला. शेपटी तुटली अन् घायाळ बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला.

Ahmednagar News : शिकार करण्यासाठी बिबट्या भक्ष्याच्या दिशेने धावला. पण, भक्ष्य काही हाती येईना. म्हणून भक्ष्यावर पंजा मारत बिबट्या थेट पिंजऱ्यात पोहोचला.
मात्र, पिंजऱ्यात हा बिबट्या मावेना. त्याची शेपटी पिंजऱ्याच्या बाहेरच राहिली. तेवढ्यात पिंजऱ्याचा खटका पडला. शेपटी तुटली अन् घायाळ बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला.
पाथर्डी तालुक्यातील पाडळी येथे ही घटना घडली. पाडळी येथील भिसे वस्ती लवण परिसरात गेल्या आठ दिवसांपासून पाऊस सुरू आहे. शुक्रवारी चारा आणण्यासाठी शेतात गेलेल्या प्रभाकर गर्जे, आदिनाथ गर्जे, महादेव आघाव, भारत भिसे, रामदास भिसे आदींना बिबट्याचे ठसे आढळले होते.
याबाबत त्यांनी वन विभागाला कळविले त्यानंतर वन विभागाने घटनास्थळी पिंजरा लावला होता. पूर्ण वाढ झालेला हा बिबट्या शुक्रवारी भक्ष्याच्या शोधात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यातील भक्ष्याची शिकार करण्यासाठी धजावला.
तो पिंजऱ्याच्या बाजूने पंजे मारत होता. परंतु शिकार हाती येत नसल्याने तो पिंजऱ्याच्या दुसऱ्या बाजूने आत शिरला बिबट्या लांबलचक असल्याने तो पूर्णपणे पिंजऱ्यात बसला नाही.
त्याची शेपटी बाहेरच राहिली. त्याचवेळी पिंजऱ्याचा खटका पडल्याने त्याची शेपटी तुटली त्यामुळे बिबट्या घायाळ झाला आणि पिंजऱ्यात अडकला.
तिसगावचे वन परिक्षेत्र अधिकारी दादासाहेब वाघुलकर, कर्मचारी व्ही. एम गाढवे, विष्णू मरकड, एकनाथ खेडकर, अशोक कुसारे, कानिफ वांढेकर आदींनी शेतकऱ्यांच्या मदतीने बंदिस्त पिंजऱ्यातील बिबट्याला वाहनातून उपचारासाठी हलविले हनुमान टाकळी,
दिंडेवाडी, चितळी, पाडळी गावच्या सीमेवर वर्षभरापासून बिबट्याची मोठी दहशत होती. आता बिबट्या पकडल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
पाच बिबटे जेरबंद
नोव्हेंबर २०२० मध्ये शिरसाठवाडी व मायंबा सावरगाव येथे प्रत्येकी एक बिबट्या पिंजयात अडकला. डिसेंबर २०२० मध्ये श्रीक्षेत्र मढी येथील शेरी मळ्यात एक बिबट्या जेरबंद झाला होता.
सप्टेंबर २०२२ मध्ये कामत शिंगवे येथे जखमी बिबट्या आढळला. त्यानंतर शुक्रवारी (२९ सप्टेंबर) पाडळी येथील भिसे लवण परिसरात एक बिबट्या पिंजयात अडकला आहे. आजअखेर या परिसरात पाच बिबटे जेरबंद झाले आहेत.
बिबट्याच्या हल्ल्यात तिघांनी गमावले प्राण
यापूर्वी पाणतासवाडी येथील सार्थक संजय बुधवंत, केळवंडीतील सक्षम गणेश आठरे, श्रीक्षेत्र मढी आमदरा वस्ती येथील श्रेया सूरज साळवे या तीन लहान बालकांवर हल्ला करून बिबट्याने प्राण घेतले होते.
कासार पिंपळगाव येथील शौर्य उमेश भगत याला बिबट्याने पळविले असता, त्याला आजीने सोडविले. तर पाडळी येथील कारभारी गजें यांनी बिबट्याशी दोन हात करीत धीरज गर्ने या नातवाची बिबट्याच्या तावडीतून सुटका केली.
घाटशिरस, जवखेडे, मांडवे, कासार पिंपळगाव, श्रीक्षेत्र मढी येथे शेळ्या-मेंढ्यांसह पाळीव कुत्र्यांच्या शिकारी झाल्या असून, चार वर्षांनंतरही येथे बिबट्याचे भय संपता संपत नसल्याचे वास्तव चित्र आहे.