अहमदनगर

घाटात करायचे लुटमार; पोलिसांकडून तिघांवर मोठी कारवाई

अहमदनगर- घाटामध्ये वाहन चालकांना आडवून मारहाण करत लुटणार्‍या सराईत गुन्हेगार संदीप कदम याच्यासह तिघांविरूद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.

 

टोळी प्रमुख संदीप दिलीप कदम (वय 25 रा. डोंगरगण ता. नगर), शशिकांत सावता चव्हाण (वय 22 रा. अंबीजळगाव ता. कर्जत), सोमनाथ रामराव खलाटे (रा. आष्टी जि. बीड) अशी त्यांची नावे आहेत.

 

या गुन्ह्याचा तपास नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी केला. अप्पर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) केे.के.सरंगल यांनी मोक्का दोषारोपपत्रास परवानगी दिल्यानंतर विशेष मोक्का न्यायालयात सुमारे 250 पानी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

 

इमामपूरच्या घाटासह शेंडी बायपास व परिसरात वाहन चालकांना आडवून शस्त्राचा धाक दाखविणे, त्यांना मारहाण करत त्यांच्याकडील पैसे काढून घेणे असे कृत्य संदीप कदम व त्याचे साथीदार करत होते. या प्रकरणी त्यांच्याविरूद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात सात गुन्हे दाखल आहेत. एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यात संदीप कदम याच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी, असा प्रस्ताव एमआयडीसी पोलिसांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या परवानगीने विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे पाठविला होता.

 

या प्रस्तावाला त्यांनी मंजूरी दिली होती. यानंतर पोलीस उपअधीक्षक पाटील यांनी याप्रकरणाचा तपास केला. त्यांनी दोषारोपपत्र तयार करून अप्पर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) केे.के.सरंगल यांची परवानगी घेतली. यानंतर विशेष मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button